धक्कादायक: चार प्राध्यापकांना अटक; इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना रात्री पुन्हा उत्तरपत्रिका लिहिण्यासाठी दिल्या..
पोलिसांनी चार प्राध्यापकांवर कारवाई केली असून विद्यापीठ प्रशासनाने सुद्धा याबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
SPPU NEWS: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न वाघोली येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना दुपारी झालेला पेपर रात्री उशिरा पुन्हा लिहिण्यासाठी दिला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार प्राध्यापकांवर कारवाई केली असून विद्यापीठ प्रशासनाने सुद्धा याबाबत चौकशी समिती स्थापन केली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. (Parvatibai Genba Moze, College Of Engeneering)
पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे सध्या विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा घेतल्या जात आहेत.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळापत्रकानुसार सुरू आहेत. सकाळच्या सत्रात परीक्षा झाल्यानंतर संबंधित उत्तरपत्रिका जमा करून महाविद्यालयात ठेवल्या जातात. तसेच त्यानंतर या उत्तर पत्रिका तपासणीसाठी पाठविल्या जातात. परंतु, संबंधित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षेत काही प्रश्नांची उत्तरे लिहिता आली नाहीत. संबंधित विद्यार्थ्यांनी उत्तर पत्रिकेतील जागा कोरी ठेवली.त्यानंतर महाविद्यालयातील प्राध्यापकांनी रात्री उशिरा पुन्हा काही विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका लिहिण्यासाठी दिल्या. याप्रकरणी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकून पोलिसांनी महाविद्यालय प्रशासनावर ही कारवाई केली आहे.
वाघोली येथील 'पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज of इंजिनिअरिंग' (Parvatibai Genba Moze, College Of Engeneering) मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. विद्यापीठाच्या परीक्षेदरम्यान झालेल्या या गोंधळामुळे विद्यापीठाच्या परीक्षेच्या गोपनीयतेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
दिनांक 0२/६/२०२५ रोजी २३.३० वा च्या सुमारास पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, पार्वतीबाई गेणबा मोझे, कॉलेज ऑफ इंजिनियरींग बायफ रोड, वाघोली, पुणे येथील मॅकनिकल इंजिनियरींग कॉलेजचे प्राध्यापक प्रतिक सातव हे कॉलेजमध्ये दुपारी झालेला पहिल्या वर्षाचा इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स - २ हा पेपर रात्री कॉलेजमध्ये इंजिनीयरींगचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांकडून पैसे घेवुन पुन्हा पेपर लिहिण्यासाठी देणार आहे.
या गोपनीय माहीतीचे अनुषंगाने पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला. त्यात कॉलेजमधील मॅकनिकल इंजिनियरींगचे प्राध्यापक प्रतिक किसन सातव, आदित्य यशवंत खिलारे, अमोल आशोक नागरगोजे, अनिकेत शिवाजी रोडे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे इंजिनियरींग विषयाचे लिहीलेले उत्तरपत्रिकेचे ६, बंडल. रोख रक्कम २ लाख ६ हजार रुपये व उत्तरपत्रिका ठेवण्यात आलेल्या कंट्रोल रूुमची चावी अशा मुद्देमालसह पकडले.
तसेच सदर ठिकाणी पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंमिनियरींग,वाघोली पुणे या कॉलेजमधे शिकणारे प्रथम वर्षाचे एकुण 8 विद्यार्थी येथे अढळले . संबंधित प्राध्यापक व त्याचे साथीदार यांनी विद्यार्थ्याना इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स -२या विषयामध्ये नापास होण्याची भिती वाटते, अशा विद्याथ्याना हेरुन त्यांच्याकडुन आर्थिक फायद्याकरीता संगनमत करुन 10 ते 15 हजार रू स्विकारले आणि पार्वतीबाई गेणबा मोझे कॉलेज ऑफ इंजिनियरींग, वाघोली या कॉलेमधील परिक्षा कंट्रोल रुमची बनावट चावी बनवुन त्या चावीद्वारे कॉलेमधील परिक्षा कंट्रोलरुम उघडून त्यामधील इंजिनियरींग मॅथेमॅटीक्स -२ या उत्तरपत्रिकेचे सहा सिलबंद बंडल काढून घेवुन विद्यार्थ्यांना त्यांची मुळ उत्तरपत्रिका पुन्हा लिहीण्यासाठी देऊन विद्यापीठाची फसवणुक केली. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.