मराठवाडा विद्यापीठात यंदापासून ऑनर्स पदवी अभ्यासक्रम सुरू

हा व्यवसायाभिमुख चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये 'अॅप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम' (AEDP) हा चार वर्षाचा पदवी अभ्यासकम असणार आहे.

मराठवाडा विद्यापीठात यंदापासून ऑनर्स पदवी अभ्यासक्रम सुरू

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

बारावी विज्ञान, कला व वाणिज्य उत्तीर्ण विद्यार्थ्यांना (12th Science, Arts and Commerce passed students) मोठी संधी चालून आली आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) चार वर्षाचा पदवी 'ऑनर्स' कोर्स (Four-year degree 'honors' course) यंदापासून सुरु होणार असल्याची माहिती विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. वाल्मिक सरवदे (University Pro-Vice Chancellor Dr. Valmik Sarvade) यांनी दिली. या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना दोन सेमिस्टर प्रत्यक्षरित्या नामांकित कंपनीत काम करण्याची संधी मिळणार असून, त्यांना छात्रवृतीही देण्यात येणार आहे.

हा व्यवसायाभिमुख चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये 'अॅप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम' (AEDP) हा चार वर्षाचा पदवी अभ्यासकम असणार आहे. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली ९ मे रोजी झालेल्या विद्या परिषद बैठकीत बी.एस्सी. (ऑनर्स) इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, बी.एस्सी (ऑनर्स) डेटा सायन्स, बीसीए (ऑनर्स) व बीए मानसशास्त्र (ऑनर्स) या अभ्यासक्रमांना मंजुरी देण्यात आली होती.

बी.एस्सी. डेटा सायन्सला ३० तर उर्वरित तीन अभ्यासक्रमांना प्रत्येकी ४० जागा असणार आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रॉनिक्स, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र व मानसशास्त्र विभागाशी संपर्क साधावा, असे पदव्युत्तर विभागाचे उपकुलसचिव माधव वागतकर यांनी कळविले आहे.

नामांकित कंपन्यांसोबत विद्यापीठाचा सामंजस्य करार

या चारही अभ्यासक्रमांसाठी नामांकित कंपन्यासोबत सामंजस्य करार केले आहेत. तसेच या कंपन्यांचे प्रत्यक्ष कामकाज अनुभवही विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. 'इलेक्ट्रॉनिक्स' कंपन्यांमध्ये देवगिरी इलेक्ट्रॉनिक्स, सिमेन्स, सीटीआर अॅन्युफॅक्चरिंग, एन्ड्रेस हौजर, व्हेरॉक, स्टारलाईट, व्हिडोओकॉन, धूत ट्रान्समिशन, क्रिश ऑटोमेशन, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, रोजन बर्गर, अॅडोनीस, रेल्कॉन हायोसंग एक्सिटॉनिक या कंपन्यांचा समावेश आहे.