CBSE परीक्षा पॅटर्न बदलला : घोकंपट्टीचा होणार नाही फायदा, संकल्पना समजून घ्यावी लागणार

अकरावी-बारावीच्या परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्न वाढविण्यात येतील. त्याचप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न, स्रोत आधारित एकत्रित प्रश्न आणि अन्य प्रश्नांचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांनी वाढविणार आहेत.

CBSE परीक्षा पॅटर्न बदलला : घोकंपट्टीचा होणार नाही फायदा, संकल्पना समजून घ्यावी लागणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (NEP)केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ ( सीबीएसई- CBSE) ने अनेक नवनवीन बदल केले आहेत. येत्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आणखीन एक महत्वपुर्ण बदल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना आता फक्त घोकंपट्टी करून चालणार नाही तर त्यांना विषयाची धड्याची संकल्पना नीट समजावून घेऊन त्या आधारे परीक्षेत उत्तरे लिहावी लागणार आहेत. त्यामुळे सीबीएसईकडून आता परीक्षेचा पॅटर्न बदलला(cbse changed exam pattern)आहे. 

अभ्यासक्रमांतील संकल्पनांची स्पष्टता विद्यार्थ्यांना यावी आणि त्यासाठी आवश्यक क्षमता त्यांच्यात विकसित व्हावी, यावर भर देणारे प्रश्न परीक्षेत विचारले जाणार आहेत. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून प्रश्नपत्रिकेच्या पद्धतीत बदल केले जाणार आहेत. या अंतर्गत अकरावी-बारावीच्या परीक्षेतील बहुपर्यायी प्रश्न वाढविण्यात येतील. त्याचप्रमाणे बहुपर्यायी प्रश्न, स्रोत आधारित एकत्रित प्रश्न आणि अन्य प्रश्नांचे प्रमाण ४० ते ५० टक्क्यांनी वाढविणार आहेत. तर लघु आणि दीर्घ उत्तरे लिहिणे अपेक्षित असणाऱ्या प्रश्नांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी कमी करण्यात येईल.

या विषयी अधिक माहिती देताना सीबीएसईचे संचालक जोसेफ इमॅन्युएल म्हणाले , " राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (२०२०) अनुषंगाने सीबीएसईने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्यानुसार शाळांमध्ये क्षमतेवर आधारित शिक्षणावर भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यता, क्रिटिकल आणि सिस्टिम थिंकिंग निर्माण व्हावी, त्यादृष्टीने बदल करण्यात येत आहेत. अकरावी-बारावीच्या परीक्षेत वास्तविक जीवनातील संकल्पनांच्या वापराचे मूल्यांकन करण्यासाठी आवश्यक त्या क्षमतेवर आधारित प्रश्नांची टक्केवारी वाढविणार आहे."