'लव्ह जिहाद' वरून विद्यापीठातील विद्यार्थ्याला मारहाण

'लव्ह जिहाद' वरून विद्यापीठातील विद्यार्थ्याला मारहाण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) एका विद्यार्थ्याला (student) 'लव्ह जिहाद' (love jihad)करायला आला का ?अशी विचारणा करत सहा ते सात तरुणांनी मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एवढेच नाही तर विद्यार्थ्यांच्या पालकाला फोन करून मुलाला घेऊन जा अन्यथा त्याचा मृतदेह घरी पाठवू, अशा प्रकारची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या पुणे विद्यापीठाचे वातावरण पुन्हा एकदा गढूळ करण्याचा प्रयत्न होत असल्याचे बोलले जात आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या जुनेद बाबाण जमादार या विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. जुनेद हा त्याच्या मित्रांबरोबर विद्यापीठातील इफेक्टरीतून जेवण करून हॉस्टेलवर जात असताना मोटरसायकल वरून सहा मुले त्याच्याकडे आली त्यांनी त्याच्या मित्रांसह जुनेदचे ओळखपत्र व आधार कार्ड मागितले. त्यातील एकाने तू मुस्लिम आहेस का ? लव्ह जिहाद करायला आला आहेस का ?अशी विचारणा करत जुनेद व त्याच्या मित्राला मारहाण केली. याप्रकरणी चतुर्श्रुंगी पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, विद्यापीठ परिसरामध्ये गुंड प्रवृत्तीच्या हिंदुत्ववादी व्यक्तींकडून विद्यार्थ्यांवर होत असलेल्या हल्ल्यांबाबत नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटी संघटनेचे राहुल डंबाळे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्याला विश्व हिंदू परिषदेच्या सात ते आठ गुंडांकडून बेदम मारहाण करून त्याचा खून करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी राहुल डंबाळे यांनी केले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात अशा प्रकारच्या घटना घडणे अत्यंत धक्कादायक असून त्यास देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकरणारे कट्टर हिंदुत्ववादी लोक जबाबदार आहेत. विद्यापीठात सातत्याने विद्यार्थ्यांवर होत असलेल्या मारहाणीच्या विरोधात विद्यापीठ व पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुद्धा राहुल डंबाळे यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन याबाबत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीचे संस्थापक अध्यक्ष राहुल डोंबाळे व राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसचे अक्षय कांबळे आदी विद्यार्थी उपस्थित होते.