एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे (US President Donald Trump)सरकार परतल्यानंतर परदेशी विद्यार्थ्यांच्या समस्या वाढल्या आहेत. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ट्रम्प सरकारने परतल्यानंतर १०० दिवसांच्या आत ४००० परदेशी विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द केले आहेत. (Trump administration cancels 4,000 foreign student visas in 100 days) अमेरिकेत केवळ विद्यार्थी व्हिसा रद्द करण्यात आले नाहीत तर काही विद्यार्थ्यांना ताब्यात देखील घेण्यात आले आहे आणि काहींना त्यांच्या देशात परत पाठवण्याची तयारी सुरू आहे.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एका बैठकीत म्हटले की, "कोणालाही विद्यार्थी व्हिसा मिळवण्याचा अधिकार नाही. जर तुम्ही या देशात विद्यार्थी म्हणून आलात, तर आम्ही तुमच्याकडून वर्गात जाण्याची, अभ्यास करण्याची आणि पदवी मिळवण्याची अपेक्षा करतो. जर तुम्ही ग्रंथालयाची तोडफोड केली, नियमांचे उल्लंघन केले तर आम्ही तुम्हाला येथून हाकलून लावू. अमेरिकेचा व्हिसा हा एक विशेषाधिकार आहे, अधिकार नाही."
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने न्यू यॉर्क पोस्टला सांगितले की, ९०% विद्यार्थ्यांचे व्हिसा रद्द करण्यात आले कारण त्यांनी काही गुन्हे केले होते. यामध्ये जाळपोळ, वन्यजीव आणि मानवी तस्करी, घरगुती हिंसाचार, मद्यधुंद वाहन चालवणे, चोरी आणि मुलांना धोका देणे यासारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अहवालानुसार, ५०० हून अधिक विद्यार्थ्यांवर हल्ल्याचा आरोप आहे.
दरम्यान डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांनी देखील ट्रम्प सरकारला नियमांच्या चौकटीत विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याची विनंती केली आहे.