विद्यापीठाकडून विद्यार्थी आंदोलनासाठी तयार केलेल्या एसओपीला स्थगिती

सोमवारी विद्यार्थी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीनंतर विद्यापीठाने या एसओपीला स्थगिती दिली जात असल्याचे जाहीर केले.

विद्यापीठाकडून विद्यार्थी आंदोलनासाठी तयार केलेल्या एसओपीला स्थगिती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) काही दिवसांपूर्वी घडलेल्या अनुचित घटनांमुळे विद्यापीठ प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संघटनांसाठी एसओपी (sop) तयार करण्याचा निर्णय घेतला.  याबाबत प्रस्तावित एसओपी तयार करण्यात आली. त्यावर सोमवारी विद्यार्थी संघटनांबरोबर झालेल्या बैठकीनंतर विद्यापीठाने या एसओपीला स्थगिती दिली जात असल्याचे जाहीर केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे विद्यार्थी संघटना व विद्यापीठ प्रशासन यांच्यात सोमवारी एसओपी संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर,  प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यावेळी उपस्थित होते. विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी एसओएपी संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच विद्यापीठाच्या इतिहासात केव्हाही एसओपी तयार करण्यात आली नाही.आत्ताच त्यांची आवश्यकता का ? असा सवाल उपस्थित केला.त्याच प्रमाणे विविध जाचक नियमावलीला विरोध केला.

विद्यार्थ्यांना आंदोलन करायचे असेल तर पाच दिवस आधी त्याची पूर्वसूचना द्यावी लागेल, विद्यापीठ प्रशासनाबरोबरच पोलीस प्रशासनाकडून सुद्धा आंदोलनाची परवानगी घ्यावी लागेल. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित संघटना त्यास जबाबदार राहील. तसेच आंदोलनामुळे विद्यापीठाच्या स्थावर व जंगम मालमत्तेचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल, त्याचप्रमाणे आंदोलनाबाबत संबंधितांकडून हमीपत्र लिहून घेतले जाईल, असे मुद्दे प्रस्तावित एसओपी देण्यात आले होते. त्यामुळे विद्यार्थी संघनानी असे नियम असू नयेत,अशी स्पष्ट भूमिका मांडली.त्यावर विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी एसओपीला सध्या स्थगिती दिली जात असल्याचे जाहीर केले.

------------------