SPPU विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यार्थी संघटनांचा एल्गार; व्यवस्थापन परिषदेचा निषेध
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे शासकीय विद्यापीठ असून शासनाच्या जागेत आहे. त्यामुळे या जागेत कोणी, केव्हा आणि कोणत्या विषयावर आंदोलन करावे, याबाबतचे अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय संविधानाने दिलेले आहेत. त्यामुळे कोणत्या विषयावर आंदोलन करावे किंवा करू नये, हे सांगण्याचे अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला नाहीत.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाविरोधात विद्यापीठातील विविध संघटना एकवटल्या असून विद्यापीठाच्या मुख्य इमारती समोर संघटनांतर्फे जोरदार आंदोलन केले जात आहे. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा व विद्यापीठ प्रशासनाचा संघटनांतर्फे निषेध करण्यात आला.आंदोलन करण्यासंदर्भात घातलेल्या निर्बंधाचे परिपत्रक विद्यापीठाने मागे घ्यावे, या मागणीसाठी विद्यार्थी संघटनातर्फे सोमवारी आंदोलन सुरू केले आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे शासकीय विद्यापीठ असून शासनाच्या जागेत आहे. त्यामुळे या जागेत कोणी, केव्हा आणि कोणत्या विषयावर आंदोलन करावे, याबाबतचे अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला भारतीय संविधानाने दिलेले आहेत. त्यामुळे कोणत्या विषयावर आंदोलन करावे किंवा करू नये, हे सांगण्याचे अधिकार विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने तात्काळ आंदोलन निर्बंधाबाबत प्रसिद्ध केलेले परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या परिसरात प्रवेश करण्यास विद्यार्थ्यांना बंदी घालण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले यांनी अन्यायाविरुद्ध लढा देण्याची शिकवण दिली. मात्र विद्यापीठात विद्यार्थ्यांना अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकाऱ्यांवर गदा आणली जात आहे. विद्यापीठ हे कोणाच्या मालकीचे नसून प्रत्येकाला संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार जगण्याची शिकवण देणारे ज्ञानपीठ आहे. त्यामुळे विद्यापीठात घटनाविरोधी निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे काम विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने करू नये, असेही विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.
विद्यापीठात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास काही विद्यार्थी संघटनांनी मुख्य इमारतीच्या आवारात आंदोलन सुरू केले. तर इतर काही विद्यार्थी संघटनांनी दुपारी चार वाजता जयकर ग्रंथालयापासून मुख्य इमारतीपर्यंत मोर्चा काढत आंदोलन केले. सुरक्षा विभागाने लावलेले बॅरिगेट ओलांडून विद्यार्थ्यांनी मुख्य इमारती जवळ कुलगुरूंच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.
----------------
विद्यापीठात आंदोलन करण्याबाबत विद्यापीठाने निर्बंध घातले नाहीत. विद्यापीठात विद्यार्थी सोडून इतर संघटना आंदोलन करतात.त्यामुळे विद्यापीठाचे शैक्षणिक वातावरण अस्थिर होऊ शकते.विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध घालण्याचा विद्यापीठाचा कोणताही हेतू नाही. तरीही विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने काढलेल्या परिपत्रकाबाबत चर्चा केली जाईल.येत्या ४ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव सादर केला जाईल, असे विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ प्रफुल्ल पवार यांनी सांगितले.