सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदांसाठी भरती

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक (Senior Personal Assistant) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ६५ पदे गट ‘ब’ मधील अराजपत्रित श्रेणीत आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे.

सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक पदांसाठी भरती

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने वरिष्ठ वैयक्तिक सहाय्यक (Senior Personal Assistant) पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया सुरू केली आहे. एकूण ६५ पदे गट ‘ब’ मधील अराजपत्रित श्रेणीत आहेत. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या पदवीधरांसाठी ही एक महत्त्वाची संधी आहे. इच्छुक उमेदवारांना १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत आहे. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन राहील.

शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा १ ऑक्टोबर २०२६ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल ३० वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मात्र राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू राहील. याशिवाय इंग्रजी लघुलेखनाचा वेग प्रति मिनिट ११० शब्द, संगणकावर टायपिंगचा वेग प्रति मिनिट किमान ४० शब्द आणि संगणकाचे मूलभूत ज्ञान असणे अनिवार्य आहे.

निवड प्रक्रिया अनेक टप्प्यांत पार पडेल. पहिला टप्पा वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा असेल. ही परीक्षा १०० गुणांची असून तिला दीड तास वेळ मिळेल. नकारात्मक गुणदान नसेल. परीक्षेत सामान्य इंग्रजी (२५ प्रश्न), सामान्य ज्ञान (२५ प्रश्न), न्यायपालिकेशी संबंधित घटनात्मक तरतुदी (२५ प्रश्न), सर्वोच्च न्यायालयाचे निकाल (१५ प्रश्न) आणि संगणक ज्ञान (१० प्रश्न) यांचा समावेश असेल.

त्यानंतर इंग्रजी लघुलेखन चाचणी १०० गुणांसाठी घेतली जाईल, ज्यात ११० शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक असेल. तसेच संगणक टायपिंग चाचणी २० गुणांसाठी असेल, ज्यात ४० शब्द प्रति मिनिट वेग अपेक्षित आहे. शेवटी मुलाखत घेतली जाईल. पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अटी व शर्ती तपासून वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.