सीएचबी, मेडिकल बील, कॅस, निवृत्तीवेतन रखडवल्यास याद राखा; मंत्री स्वत:घेणार झाडाझडती 

निवृत्तीवेतन,कॅस,सीएचबी बील, मेडिकल बील अशी कोणतीही कामे प्रलंबित दिसल्यास संबंधिताना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे,असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उच्च शिक्षण विभागाला स्पष्टपणे सांगितले आहे.

सीएचबी, मेडिकल बील, कॅस, निवृत्तीवेतन रखडवल्यास याद राखा; मंत्री स्वत:घेणार झाडाझडती 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राज्यातील प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि तासिका तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक अर्थात सीएचबी धारक (Professors, Principals, Non-Teaching Staff and Retired Staff, CHB)यांचे सर्व प्रलंबित प्रश्न एका महिन्याच्या आत निकाली काढा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Higher and Technical Education Minister Chandrakant Patil)यांनी उच्च शिक्षण संचालक कार्यालयाला दिले आहेत. तसेच स्वत:मंत्री फेब्रुवारी महिन्यात सर्व उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयात (Office of the Joint Director of Higher Education) प्रत्यक्ष भेट देऊन कार्यालयाची झाडाझडती घेणार आहेत. त्यामुळे निवृत्तीवेतन,कॅस,सीएचबी बील, मेडिकल बील (Pension, CAS, CHB Bill, Medical Bill)अशी कोणतीही कामे प्रलंबित दिसल्यास संबंधिताना मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाईस सामोरे जावे लागणार आहे,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना सांगितले. 

राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली असून शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत.त्याचबरोबर आता उच्च शिक्षण विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्याकडेही गांभीर्याने लक्ष दिले जाणार आहे.त्यामुळे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनी कृती कार्यक्रम दिला असून महिना भरात सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयाला अवधी देण्यात आला आहे.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, निवृत्तीवेतन,कॅस,सीएचबी धारकांचे वेतन ,मेडिकल बील अशा विविध प्रलंबित कामाबाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील गंभीर आहेत.त्यांनी उच्च शिक्षण व सर्व शिक्षण सहसंचालक कार्यालयांना महिन्याभरात सर्व कामांचा निपटारा करावा,असे निर्देश दिले आहेत.त्यानुसार सहसंचालक कार्यालय, विद्यापीठ आणि महाविद्यालये यांचे संयुक्त शिबिर आयोजित केले जाणार आहेत.'तुम्ही प्रश्न सांगा आम्ही ते सोडवू' या भूमिकेत येऊन आता 'झीरो पेंडन्सी' चे उद्दिष्ट समोर ठेऊन काम केले जाणार आहे. 

सर्व सहसंचालक कार्यालयांना कामे संपविण्यासाठी केवळ एक महिना आहे.त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात स्वत: उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे दिवस- दिवस सहसंचालक कार्यालयात बसून सर्व कामांचा आढावा घेणार आहेत.त्यानंतर कामे रखडल्याचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे,असेही देवळाणकर यांनी सांगितले.