मुंबई विद्यापीठाची पदवी प्रवेशप्रक्रिया उद्यापासून सुरू
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सर्व महाविद्यालयांमध्ये २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी पदवीच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमांसाठीची प्रवेश प्रक्रिया उद्या, गुरुवारपासून सुरू होत आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर https://mu.ac.in/admission या लिंकवरून प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
विद्यापीठाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार असून १३ जूनपासून नियमित वर्गांना सुरुवात होईल. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, "विद्यार्थ्यांच्या प्रवेशपूर्व नोंदणीशिवाय महाविद्यालयांमध्ये प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. ऑनलाइन नोंदणीसोबत अर्ज भरणे, कागदपत्र पडताळणी आणि शुल्क भरणे ही प्रक्रिया टप्प्यांनुसार करावी लागणार आहे. सर्व प्रवेश हे महाराष्ट्र शासन व विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होतील."