शाळेच्या बॅगेत ४ अल्पवयीन विद्यार्थ्यांकडे आढळले कोयते; वेळीच घटना उघड झाल्याने अनर्थ टळला
लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संकुलात शिकणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बॅगेत तीन कोयते सापडल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मुलांना शाळेत पाठवल्यानंतर पालकांची जबाबदारी संपते, असा गैरसमज असलेल्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर येथील एका नामांकित शैक्षणिक संकुलात शिकणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या शाळेच्या बॅगेत तीन कोयते सापडल्याने शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. मुलांना शाळेत पाठवल्यानंतर पालकांची जबाबदारी संपते, असा गैरसमज असलेल्यांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. किरकोळ वादातून एकमेकांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने विद्यार्थ्यांनी शस्त्रे शाळेत आणली होती. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला असला तरी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकांऐवजी कोयते येणे ही चिंताजनक बाब आहे.
लोणी गावातील अंबरनाथ मंदिर परिसर आणि कदमवाडी-पांडवदंड भागातील चार विद्यार्थ्यांमध्ये काही कारणाने वाद झाला होता. या वादातून एकमेकांना धडा शिकवण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांनी शाळेच्या बॅगेत कोयते घेतले होते. शाळेत हा प्रकार लक्षात आल्यानंतर व्यवस्थापनाने तातडीने पोलिसांना कळवले. लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप करून चारही अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत विद्यार्थ्यांमधील वाद आणि त्यातून निर्माण झालेली हिंसक भावना स्पष्ट झाली.

पोलिसांनी विद्यार्थ्यांचे भविष्य खराब होऊ नये यासाठी त्यांना समज दिली आणि पालकांना बोलावून मुलांच्या वर्तनाकडे लक्ष देण्याबाबत तंबी दिली. त्यानंतर चारही विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. शिक्षण घेण्याच्या आणि आयुष्य घडवण्याच्या वयात विद्यार्थ्यांच्या हातात शस्त्रे येणे हे सामाजिक वातावरणाच्या दृष्टीनेही चिंताजनक आहे. किरकोळ वादातून शस्त्र वापरण्याची मजल पोहोचणे ही प्रवृत्ती थांबवणे आवश्यक आहे.
पालकांनी फक्त महागडे मोबाईल देणे, शिक्षणावर खर्च करणे आणि मुलांना शाळेत पाठवणे एवढेच कर्तव्य समजू नये. मुले कोणाच्या संगतीत राहतात, मोबाईलवर काय पाहतात, त्यांचे मित्र कोण आहेत आणि त्यांच्या वागण्यात बदल झाला आहे का, याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. चुकीची संगत आणि वाढती हिंसक प्रवृत्ती मुलांचे भविष्य उद्ध्वस्त करू शकते. आज शाळेच्या बॅगेत कोयता सापडला आहे; उद्या निष्काळजीपणामुळे एखाद्याची जीवितहानी झाली तर जबाबदारी कोणाची, हा प्रश्न प्रत्येक पालकाने स्वतःला विचारायला हवा.
ही घटना शिक्षण क्षेत्र आणि समाजाला गंभीर इशारा देणारी आहे. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक मूल्यांची जोपासना आणि पालकांचे सक्रिय लक्ष या दोन्हींची आज सर्वाधिक गरज आहे. वेळीच जागरूक राहून अशा घटना रोखणे शक्य आहे.