सीईटी सेलमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार; स्टिंग ऑपरेशनमधून धक्कादायक खुलासा, रोहित पवारांची पत्रकार परिषद, मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेतील प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत या घोटाळ्यामुळे सीईओपी कॉलेजची रँक लक्षणीयरीत्या घसरली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील सीईटी परीक्षेतील प्रवेश प्रक्रियेत मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत या घोटाळ्यामुळे सीईओपी कॉलेजची रँक लक्षणीयरीत्या घसरली आहे. सीईटी परीक्षेत डेटा लीक झाल्याची तक्रार करण्यात आली होती. सरकारने याबाबत विशेष चौकशी पथक (एसआयटी) नेमले असले तरी पुढे ठोस कारवाई झालेली दिसत नाही. या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी एक स्टिंग ऑपरेशन दाखवत संपूर्ण प्रकरणाची तीव्रता अधोरेखित केली.
रोहित पवार यांनी एड्युस्पार्क नावाच्या कंपनीवर डेटा लीकचा मुख्य संशय व्यक्त केला. या कंपनीला राज्यात सुमारे २ हजार ३०० कोटी रुपयांची कामे देण्यात आली आहेत. ही कंपनी केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित नसून बिहारसह देशातील अनेक राज्यांमध्येही काम करते. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या विविध मंत्र्यांच्या काळात या कंपनीला सतत कामे मिळत राहिल्याचा आरोप आहे. उदय सामंत यांच्या काळात पहिले काम दिले गेले, त्यानंतर चंद्रकांत पाटील, दीपक केसरकर आणि पुन्हा चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळातही हेच काम चालू राहिले. ही कामे चुकीच्या पद्धतीने दिली गेली असून कंपनीने २ हजार ३०० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे,असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

शिक्षक नारायण शिंगारे यांनीही या प्रकरणात स्टिंग ऑपरेशन केल्याचे सांगितले. त्यांच्या मते, अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी सीईटी परीक्षा निर्णायक असते, पण तिथेच मोठा घोटाळा सुरू आहे. सीईटीसाठी २५ लाख रुपयांचा रेट सांगितला जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रकांत पाटील मंत्री झाल्यापासून शिक्षण व्यवस्थेची वाट लागली असल्याचा आरोप करत त्यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली. “ही व्यक्ती पदावर राहू नये. ते विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाहीत. ही व्यवस्था किडलेली आहे आणि ती तात्काळ थांबवली पाहिजे,” असे त्यांनी आवाहन केले.
विद्यार्थ्यांना सीईटी सेलच्या माध्यमातून परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी बोलवले जाते. मात्र विद्यार्थी ज्या कॉम्प्युटरवर परीक्षा देत असतो त्याचा एक्सेस इतर ठिकाणी दिला जातो. त्रयस्थ व्यक्ती संबंधित विद्यार्थ्यांचा पेपर ऑनलाईन पद्धतीने सोडवतो. त्यात संबंधित विद्यार्थ्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात. त्याचप्रमाणे पैसे देणाऱ्या विद्यार्थ्याला त्याला हवे असणारे कॉलेज सीईटी सेलच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाते, असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. त्यामुळे शिक्षण खात्यात नेमके चालले काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सीईटी सेल राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या कार्यकक्षेत येत असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, त्याचप्रमाणे या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. शिक्षकांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तसेच एसआयटीकडेही गुन्हा दाखल करण्यासाठी संपर्क साधला, पण कुठेही गुन्हा नोंदवला गेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात प्रशासनाची उदासीनता दिसून येत आहे. रोहित पवार आणि शिक्षकांनी या घोटाळ्याविरोधात लढा सुरू ठेवण्याचे संकेत दिले आहेत.
सीईटी प्रवेश प्रक्रियेतील हा आरोपित घोटाळा शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास उध्वस्त करणारा ठरत आहे. पारदर्शक चौकशी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई झाल्यासच विद्यार्थ्यांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.