विद्यापीठे म्हणजे नुसत्या उंच उंच मनोराच्या आकर्षक इमारती नव्हेत...

विद्यापीठ परिसराचा प्रत्येक सदस्य संस्था बांधणीच्या प्रक्रियेचा शिल्पकार आहे हे सर्वच संबंधितांच्या मनावर ठसविण्याची गरज आहे. 

विद्यापीठे म्हणजे नुसत्या उंच उंच मनोराच्या आकर्षक इमारती नव्हेत...

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

विद्यापीठे म्हणजे नुसत्या उंच उंच मनोराच्या आकर्षक इमारती नव्हेत.  या इमारतींच्या आत जे सकस आणि संपन्न संस्था जीवन ऐतिहासिक काळापासून फुलत आले तसे जिवंत आणि रसरशीत संस्था जीवन म्हणजे विद्यापीठ. आधुनिक काळातील विद्यापीठे केवळ ज्ञान मंदिरे नाहीत व केवळ प्रयोगशाळा नाहीत.  नवे ज्ञानयोग हे ज्ञानाच्या उपयोजनाचे योग आहे. त्याकरिता अधिक उपयोजनाक्षमा ज्ञानशाखांचा विकास अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन माजी खासदार व भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे माजी अध्यक्ष  डॉ. विनय सहस्रबुद्धे (Dr. Vinay Sahasrabuddhe) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University)केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 123 व्या पदवी प्रदान समारंभ डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी, प्र कुलगुरू डॉ.पराग काळकर, कुलसचिव डॉ.विजय खरे,  विद्यापीठाच्या परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.महेश काकडे आदी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना सुवर्णपदकांचे व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

सहस्रबुद्धे म्हणाले, विद्यापीठांनी संस्था बांधणीशास्त्र, नेतृत्वशास्त्र आणि संघटनशास्त्र यांसारख्या उपायोजनक्षम ज्ञानशाखा निर्माण कराव्यात. जेणेकरून वैचारिक दांभिकतेचे आकर्षण मुळापासून नष्ट होण्यास मदत होईल.विद्यापीठाचे मनोरे उंच होतीलच पण त्याचा पायाही मजबूत होईल. त्यासाठीच विद्यापीठ परिसराचा प्रत्येक सदस्य संस्था बांधणीच्या प्रक्रियेचा शिल्पकार आहे हे सर्वच संबंधितांच्या मनावर ठसविण्याची गरज आहे. 

रमेश बैस म्हणाले, गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाचे उद्दीष्ट केवळ रोजगार निर्मिती एवढे मर्यादीत नसून एक जीवंत, समाज संलग्न, सहयोगी समुदाय आणि एक समृ्द्ध राष्ट्र निर्मितीची किल्ली आहे. तसेच नव्या शैक्षणिक धोरणात उच्च शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले आहे. उच्च शिक्षणाचे महत्व वाढत असतांना देशातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणातही रचनात्मक बदल करावे लागतील. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील विविध विभागांनी अधिक संवेदनशीलतेने अभ्यासक्रम आणि नव्या शैक्षणिक धोरणावर लक्ष केंद्रीत करावे. 

राज्यपालांच्या हस्ते विविध परीक्षांमध्ये प्रावीण्य संपादन केलेल्या १० विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन सन्मानित करण्यात आले. यात नाशिकमधील अशोका सेंटर फॉर बिझनेस अॅण्ड कॉम्प्युटर स्टडिज महाविद्यालयातील श्रीमती रिद्धी सुनिल कलंत्री या विद्यार्थीनीला ‘द प्रेसिडेंट ऑफ इंडिया शंकर दयाल शर्मा सुवर्णपदक’ प्रदान करण्यात आले. तसेच विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेंतर्गत सन २०२२-२०२३ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्जतमधील रयत शिक्षण संस्थेचे दादा पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राजक्ता प्रमोद पठाडे या विद्यार्थीनीचा ‘श्रीमती निलिमाताई पवार सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आला. यांच्यासह वनस्पती शास्त्र विषयातील उत्कृष्ट पीएचडी थिसीससाठी सतिशकुमार मौर्य, गणित विषयातील उत्कृष्ट पीएचडी थिसीससाठी अमोल सोनवणे, मराठी विषयातील उत्कृष्ट पीएचडी थिसीससाठी विजय कामडी, इतिहास विषयातील उत्कृष्ट पीएचडी थिसीससाठी राहुल मगर, विज्ञान शाखेत गुणवत्ता प्राप्त गंगाधर किटाळे, संजू पांडे, एमबीए ट्राय सेमिस्टरमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारी विग्यान पटिएल यांचा सुवर्णपदक देऊन सन्मान करण्यात आले.  यावेळी कार्यक्रमात विद्यापीठाचे कुलगुरू यांनी विद्यापीठाच्या विविध विकासात्मक घडामोडींचा आढावा घेतला.

------------------
पुण्याच्या परिसरात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी हजारो विद्यार्थी येत असतात. परंतु,अशा विद्यार्थ्यांसाठी कॉल बॅक अरेंजमेंटची व्यवस्था नसते त्यामुळे आपल्या उमेदीची चार-पाच वर्ष स्पर्धा परीक्षेमध्ये घालविल्यानंतर जर  पदरात काही पडले नाही तर अशा विद्यार्थ्यांना स्वतःचे भावनिक व्यवस्थापन अतिशय अवघड होतं त्यावेळी करिता पुणे विद्यापीठाने काहीतरी करायला हवे.
-विनय सहस्रबुद्धे , माजी खासदार व माजी अध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद