तरुणांचे भविष्य धोक्यात, निष्क्रिय गृहमंत्रालयामुळे पेपर फुटीच्या घटना
प्रत्येक परीक्षेनंतर पेपर फुटीच्या बातम्या येतात, विद्यार्थी रस्त्यावर येतात, एफआयआर होतात, पण पुढचा तपास मंद किंवा शून्य असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात मान्य केलं की अशा ४८ एफआयआर दाखल झाल्या आहेत. पण प्रश्न हा आहे या गुन्ह्यांचं पुढे काय? असा सवाल शबरीन यांनी केला आहे.

एज्युवार्त न्यूज नेटवर्क
महाराष्ट्रातील तरुणाई आज मोठ्या आशेने स्पर्धा परीक्षा (Competitive Examination) देत आहे. अनेकांनी वर्षानुवर्षे अभ्यास करून मेहनतीने पेपर दिले आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, आज राज्यात एकही सरळसेवा परीक्षा अशी नाही जी घोटाळ्याशिवाय (Paper copy scam) पूर्ण झाली आहे. ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तेच आरोपी परत परत नवीन पेपर फोडत आहेत. त्यांना माहीत आहे की राज्याचं गृहमंत्रालय निष्क्रिय आहे. पोलिसांची कारवाई नाही, तपास नाही, शिक्षा तर दूरच. हे पाहून ही टोळी अधिक बिनधास्त झाली आहे. यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांची मेहनत पाण्यात घालण्याचे काम हे सरकार करत असून तरुणांचे भविष्य धोक्यात आले आहे, असा आरोप मुंबई युवती काँग्रेसच्या उपाध्यक्षा झिनत शबरीन (Zeenat Shabrin) यांनी केला आहे.
फडणवीस सरकारच्या काळात नोकर भरतीमध्ये साखळी पद्धतीने घोटाळे होत आहेत. प्रत्येक परीक्षेनंतर पेपर फुटीच्या बातम्या येतात, विद्यार्थी रस्त्यावर येतात, एफआयआर होतात, पण पुढचा तपास मंद किंवा शून्य असतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात मान्य केलं की अशा ४८ एफआयआर दाखल झाल्या आहेत. पण प्रश्न हा आहे या गुन्ह्यांचं पुढे काय? असा सवाल शबरीन यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आमच्या आंदोलनातून तीन मोठे घोटाळे बाहेर आले. त्यावेळी पोलिसांनी तपास केला, आरोपींना अटक झाली, कारवाई झाली. तेव्हा सरकारने दाखवलेली गंभीरता आता दिसत नाही. आज लाखो विद्यार्थी हवालदिल आहेत. प्रामाणिक उमेदवारांचे वर्षानुवर्षांचे कष्ट पाण्यात जात आहेत. या सरकारच्या निष्क्रियतेमुळे अनेक जण नैराश्यात आहेत. एवढं तरी करा सरळसेवा परीक्षा MPSC कडे द्या. निदान प्रक्रियेला पारदर्शकता तरी मिळेल, असे झिनत शबरिन यांनी म्हटले आहे.
सरकारकडे मागण्या -
४८ एफआयआर प्रकरणांवर जलद आणि स्वतंत्र न्यायिक तपास व्हावा. पेपर फुटी प्रकरणात दोषींवर UAPA प्रमाणे कठोर कारवाई करावी. MPSC कडे सर्व सरळसेवा परीक्षा सोपवण्यात याव्यात. विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवण्यासाठी विशेष तपास यंत्रणा स्थापन करावी, अशा मागण्यात मुंबई युवती काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत.