NEP संदर्भातील कोणताही प्रश्न थेट विचारा; प्रत्येकाचे मिळणार उत्तर 

उच्च शिक्षण संचालक कार्यालयाचे प्रमुख अधिकारी , तंत्र शिक्षण संचालक कार्यालयाचे अधिकारी आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष व सदस्य एनईपी संदर्भातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सर्वांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत.

NEP संदर्भातील कोणताही प्रश्न थेट विचारा; प्रत्येकाचे मिळणार उत्तर 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Education Policy)अंमलबजावणीला (NEP) सुरुवात झाली आहे.सर्व विद्यापीठांनी त्यासाठी प्राध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या आहेत. मात्र, तरीही एनईपी संदर्भात प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी (Professors, Principals, Students) यांच्या मनात काही प्रश्न आहेत.त्यामुळे  NEP बाबतच्या प्रत्येक प्रश्नाचे थेट उत्तर देण्याची सुविधा राज्याच्या उच्च व तंत्र शिक्षण संचालक कार्यालयातर्फे (Director of Higher and Technical Education) उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या मनातील शंकांचे समाधान होईल ,असा विश्वास राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर (Director of Higher Education Dr. Shailendra Devlankar) यांनी 'एज्युवार्ता' शी बोलताना व्यक्त केला.

महाराष्ट्रात सर्वप्रथम स्वायत्त महाविद्यालय आणि विद्यापीठातील विभागामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयामध्ये एनईपीच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. राज्य शासनाच्या निर्देशानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांनी एनईपी संदर्भात प्राध्यापकांच्या कार्यशाळा घेतल्या. एनईपीची अंमलबजावणी कशी करावी ? या संदर्भात आवश्यक मार्गदर्शन केले.तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली एनईपी अंमलबजावणीसाठी स्थापना केलेल्या सुकाणू समितीच्या सदस्यांनी सुध्दा वेळोवेळी व्याखाने देऊन मार्गदर्शन केले.मात्र, तरीही प्राध्यापकांमध्ये एनईपी संदर्भात काही शंका, कुशंका आहेत. त्यामुळेच राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण संचालक कार्यालयाने ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून एनईपी बाबतच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे थेट संचालकांना सुध्दा याबाबत प्रश्न विचारता येणार आहेत.

डॉ. शैलेंद्र देवळाणकर ' एज्युवार्ता ' शी बोलताना म्हणाले, उच्च शिक्षण संचालक कार्यालयाचे प्रमुख अधिकारी , तंत्र शिक्षण संचालक कार्यालयाचे अधिकारी आणि सुकाणू समितीचे अध्यक्ष व सदस्य एनईपी संदर्भातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी सर्वांसाठी ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध होणार आहेत. पुढील महिन्यापासून प्रत्येक आठवड्यातून एकदा ऑनलाइन पद्धतीने इच्छुक प्राध्यापकांना , विद्यार्थ्यांना एनईपी संदर्भातील त्यांचे प्रश्न विचारण्याची संधी उपलब्ध करून दिली जाईल.