90-95 सोडून 4,11,पर्सेंटाइलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश ; पालकांचे CET Cell मध्ये ठिय्या आंदोलन 

पालकांनी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्यात यावेत, अशी मागणी केली.

90-95 सोडून 4,11,पर्सेंटाइलच्या विद्यार्थ्यांना प्रवेश ; पालकांचे CET Cell मध्ये ठिय्या आंदोलन 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुणे व पिंपरी चिंचवड परिसरातील नामांकित महाविद्यालयांनी ( colleges in Pune and Pimpri Chinchwad campus)संस्थात्मक स्तरावरील प्रवेश प्रक्रियेत (Institutional level admission process)व कॅप राऊंड नंतर शिल्लक राहिलेल्या जागांवर राबविलेल्या प्रवेश प्रक्रियेत गोंधळ घातल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून पालकांकडून केला जात आहे.90 ते 95 पर्सेंटाइल (percentile)असणाऱ्या विद्यार्थ्यांना सोडून 4, 11,13,21 असे पर्सेंटाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांना नामांकित महाविद्यालयांनी प्रवेश दिले आहेत.त्यामुळे सोमवारी काही पालकांनी थेट मुंबई येथील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (State Common Entrance Test Cell) कार्यालयात जाऊन ठिय्या आंदोलन केले.तसेच नियमबाह्य प्रवेश प्रक्रिया रद्द करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे पुढील चार दिवसात याबाबत कारवाई न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा युवासेनेतर्फे देण्यात आला. 

अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत नियम डावलून प्रवेश देण्यात आले असल्याचे तक्रार युवा सेनेच्या वतीने राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष व तंत्र शिक्षण विभागाकडे देण्यात आली होती. त्यावर संबंधित महाविद्यालयांना नोटीसा पाठविण्यात आल्या होत्या. काही दिवसांपूर्वी तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात पालकांनी याबाबत तक्रारींचा पाढा वाचला होता. त्यावर 30 सप्टेंबर रोजी सीईटी कार्यालयाला यावा संदर्भातील अहवाल सादर केला जाईल,असे तंत्र शिक्षण विभागातर्फे पालकांना आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पालकांनी आता थेट सीईटी सेल कार्यालयात जाऊनच न्याय मागितला. त्याचप्रमाणे पालकांनी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांच्याकडे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना नियमानुसार प्रवेश देण्यात यावेत, अशी मागणी केली.

---------------

पुण्यातील काही महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाविरोधात मुर्दाबादच्या घोषणा दिल्या होत्या. विद्यार्थ्यांनी व पालकांनी सोमवारी सीईटी सेल कार्यालयात एकत्र येऊन नियमबाह्य प्रवेश राबवणाऱ्या महाविद्यालयांची पुन्हा तक्रार केली. 90 ते 95 पर्सेंटाइल असताना विद्यार्थ्यांना प्रवेश दिले गेले नाहीत. परंतु 4, 11,13,21 असे परसेंटाइल असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नियम डावलून विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते. ही वस्तुस्थिती पाहता नियमबाह्य प्रवेश करणाऱ्या महाविद्यालयांचे प्रवेश रद्द होणे गरजेचे आहे. अन्यथा युवासेना व पालक चार दिवसानंतर न्यायालयात दाद मागतील.

- कल्पेश यादव, सहसचिव युवासेना