Eduvarta Big Breaking : शिक्षण विभागाकडून 15 अनधिकृत शाळांची यादी जाहीर; विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन

शिक्षण विभागाने पुन्हा या शाळांवर कारवाईचा बडगा उभारला असून येत्या शैक्षणिक वर्षात संबंधित शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे, याबाबतचे प्रसिद्धी पत्रक हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी नीलिमा म्हेत्रे यांनी प्रसिद्ध केले आहे.

Eduvarta Big Breaking : शिक्षण विभागाकडून 15 अनधिकृत शाळांची यादी जाहीर; विद्यार्थ्यांना प्रवेश न घेण्याचे आवाहन

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शासनाची कोणतीही परवानगी न घेता राजरोसपणे शाळा सुरू करून शासनाची व विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या हवेली तालुक्यातील १५ शाळांची यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात  नामांकित शाळांचा समावेश असून या शाळांनी शिक्षण हक्क कायदा व स्वयंअर्थसाहित कायद्याचे उल्लंघन केले असल्याचा ठपका शिक्षण विभागाने ठेवला आहे.

हेही वाचा: विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात अंडी अन् केळी

शिक्षण विभागातर्फे राज्यातील सर्व अनधिकृत शाळांवर कारवाई करण्याची मोहीम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यात काही शाळांवर कारवाई करून या शाळा बंद करण्यात आल्या. परंतु, अजूनही शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत शहरात अनेक शाळा बेकायदेशीरपणे सुरू आहेत. शिक्षण विभागाने पुन्हा या शाळांवर कारवाईचा बडगा उभारला असून येत्या शैक्षणिक वर्षात संबंधित शाळेत प्रवेश घेऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे, याबाबतचे प्रसिद्धी पत्रक हवेली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी नीलिमा म्हेत्रे यांनी प्रसिद्ध केले आहे.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनधिकृत शाळांची तपासणी करण्यात आली. त्यातील काही शाळांना जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी अशोक गोडसे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी भेट दिली.त्यात या शाळा अनधिकृत असल्याचे दिसून आले.

शासनाची मान्यता असल्याचे भासवून या शाळांकडून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला आहे. प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करणे, अधिकार नसताना पालकांकडून फी वसूल करून आर्थिक गैरव्यवहार करणे, शासकीय नियमांचे पालन न करणे, विद्यार्थ्यांची अनधिकृतरीत्या पटावर नोंदणी करणे, अन्य शाळांकडून नियमबाह्यरित्या दाखला मागणी करणे, शासनाचा महसूल बुडवून शासनाची, पालकांची व विद्यार्थ्यांची फसवणूक करणे, शाळा बंद केले बाबत शिक्षण विभागास दिशाभूल करणारी माहिती देणे, पालकांकडून भरमसाठ फी वसूल करून नफेखोरी करणे, शासन नियमानुसार भौतिक सुविधा उपलब्ध नसणे, शाळेच्या दर्शनी भागावर शाळा मान्यता क्रमांक ,संलग्नता क्रमांक, यु-डायस क्रमांक प्रदर्शित न करणे अशा बाबी शिक्षण विभागाकडून केलेल्या तपासणीत निदर्शनास आल्या आहेत.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, हवेली तालुक्यातील संबंधित शिक्षण अधिकाऱ्यांनी प्राथमिक जिल्हा शिक्षण कार्यालयास अद्याप याबाबत माहिती कळवली नाही,असे सांगितले.

------------------------

" हवेली तालुक्यात १५ अनधिकृत शाळा आढळून आल्या असून इतर अनधिकृत शाळांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे अनधिकृत शाळांमध्ये भर पडणार आहे, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये."

- अशोक गोडसे, विस्तार अधिकारी , शिक्षण , जिल्हा परिषद 


 अनधिकृत शाळांची यादी पुढील प्रमाणे : 


१) नारायणा टेक्नो स्कूल, वाघोली


२) श्रीमती सुलोचना ताई झेंडे सेमी इंग्लिश स्कूल ,कुंजीरवाडी


३) न्यू विस्डम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा


४) मारीगोल्ड इंटरनॅशनल स्कूल, कदम वस्ती, सोलापूर रोड


५) द टायग्रीस  इंटरनॅशनल स्कूल, कदम वस्ती ,सोलापूर रोड


६) रामदरा सिटी स्कूल, लोणी काळभोर


७) स्मार्ट किड्स इंग्लिश स्कूल, आव्हाळवाडी, वाघोली


८) विठ्ठल तुपे ई लर्निंग स्कूल, पिंपरी सांडस


९) रिव्हर्सस्टोन इंटरनॅशनल स्कूल ,पेरणे


१०) ग्यानम ग्लोबल स्कूल, सर्वे नंबर 270 / 5, उरळी देवाची


११) कल्पवृक्ष इंग्लिश स्कूल, किरकिटवाडी


१२) क्रेझ इंग्लिश मीडियम स्कूल कोल्हेवाडी, खडकवासला


१३) पुणे इंटरनॅशनल स्कूल, अष्टापुर मळा, लोणी काळभोर


१४) छत्रभुज नरसी स्कूल , अमनोरा पार्क टाउन, साडे सतरा नळी


१५) विब्ग्योर स्कूल, केसनंद