नगर रचना विभाग पदभरती परीक्षा खासगी परीक्षा केंद्रांवर; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा आक्षेप

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्याच्या नगर रचना विभागातील (Urban Planning Department of the State) रचना सहायक (city planning Assistant), उच्चश्रेणी लघुलेखक व निम्नश्रेणी लघुलेखक गट- ब (अराजपत्रित) संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरण्याची कार्यवाही नगर रचना संचालनालयाच्या स्तरावरुन सुरु आहे.या पदभरतीसाठी टी.सी.एस. कंपनीमार्फत आयोजित करण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा येत्या २५ ते २७ नोव्हेंबर रोजी विविध केंद्रांवर घेतली जाणार आहे.मात्र, ही परीक्षा काही खासगी केंद्रांवर होणार असल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने त्यावर आक्षेप घेतला आहे.या केंद्रांवर परीक्षा घेतल्यास पेपर फुटीची घटना घडू शकते,अशी भीती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने X या सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.तसेच सपर्व परीक्षा टीसीएस आयओएन परीक्षा केंद्रावरचा घेण्याची मागणी केली आहे.
राज्याच्या नगर रचना विभागातर्फे विविध पदांच्या परीक्षा येत्या२५ ते २७ नोव्हेंबर या कालावधीत घेतल्या जाणार असून त्यासाठी आवश्यक कार्यवाहीचे पत्रक नुकतेच प्रसिध्द करण्यात आले आहे. या परीक्षा प्रत्येक परीक्षा केंद्रावर सकाळी ०९.०० ते ११.०० दुपारी १२.३० ते २.३० व संध्याकाळी ४.३० ते ६.३० अशा तीन सत्रांमध्ये घेतल्या जाणार आहेत. संबंधित ठिकाणच्या प्रत्येक परीक्षा केंद्रांस भेट देऊन देखरेख करणे, अनुचित प्रकार होऊ नये याची दक्षता घेणे. तसेच एकूण परिस्थितीचा आढावा घेणे, टी.सी.एस. कंपनीस स्थानिक पातळीवर आवश्यकतेनुसार सर्वोतोपरी सहाय्य करणे यासाठी नाशिक विभागीय कार्यालयाच्या अधिपत्याखालील प्रत्येक शाखा अधिकाऱ्याने संबंधित जिल्हयातील शाखाधिकारी/नगर रचनाकार व दोन सहायक नगर रचनाकारांसह प्रत्येक परीक्षा केंद्रांवर प्रत्यक्ष उपस्थित राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
नगर रचना विभागातील रिक्त पदांची भरती खासगी व सायबर कॅफे सारख्या परीक्षा केंद्रांवर घेऊ नये,या मागणीची निवेदने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने संबंधित अधिकाऱ्यांना दिले होते.मात्र, तरीही खासगी परीक्षा केंद्रांवर या परीक्षा आयोजित केल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे या परीक्षा केवळ टीसीएस आयओएन परीक्षा केंद्रावर घ्याव्यात. विद्यार्थ्यांच्या भवितव्यांशी शासनाने खेळू नये,अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केली आहे.