आमदार रोहित पवार पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर

आमदार रोहित पवार यांच्यासह भाजपाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांचीही सिनेटवर नियुक्ती झाली आहे,असे रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

आमदार रोहित पवार पुणे विद्यापीठाच्या ‘सिनेट’वर

सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार यांची राज्य विधानमंडळाने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केली आहे.त्यामुळे पवार कुटुंबातील दुसरे सदस्य पुणे विद्यापीठाच्या आधिसभेचे काम पाहणार आहेत.यापूर्वी सुनेत्राताई पवार यांनी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळाचे काम पाहिले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे युवा आमदार रोहित पवार यांनी शासनाकडे वेळोवेळी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडून ते सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ‘एमपीएससी’ची परीक्षा बहुपर्यायी न होता ‘युपीएससी’च्या धर्तीवर वर्णनात्मक पद्धतीने होणार आहे. परंतु हा निर्णय लगेचच लागू न करता २०२५ पासून लागू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी होती. त्यासाठी  विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. याबाबत रोहित पवार यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची व्यक्तीशः भेट घेऊन विद्यार्थ्यांची बाजू मांडली होती. परिणामी सरकारला विद्यार्थ्यांच्या बाजूने निर्णय घ्यावा लागला.

पुण्यात विश्रांतवाडी येथील बांधकाम पूर्ण झालेले शासकीय वसतीगृह तातडीने सुरु करण्याचा विषयावर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतील अडचणी दूर करण्याच्या विषयावरही त्यांनी आवाज उठवला होता. वेगवेगळ्या  पद भरती परिक्षेतील घोळ, पदवी आणि तत्सम अभ्यासक्रमाच्या तारखा, पदभरती, परिक्षा रद्द होणे, त्यातील चुकीच्या अटी, गोंधळ अशा अनेक विषयांवर आमदार रोहित पवार यांनी सध्याच्या शिंदे-फडणवीस सरकारसह आधीच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातही विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आहे. आमदार रोहित पवार यांच्यासह भाजपाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांचीही सिनेटवर नियुक्ती झाली आहे,असे रोहित पवार यांच्या कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

-----------

‘‘माझ्या पक्षाने आणि विधिमंडळाने माझ्यावर विश्वास टाकत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर नियुक्ती केल्याबद्दल मी पक्षाचा, विधानमंडळाचा आणि अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांचा आभारी आहे. अभ्यासक्रमापासून, परिक्षा शुल्क, वसतीगृह, स्कॉलरशीप, ॲडमिशन असे विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न आहेत. याबाबत माझी विद्यार्थ्यांसोबत नियमित चर्चाही होत असते. पुढील काळात हे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करील.’’-

रोहित पवार आमदार, कर्जत-जामखेड