विद्यापीठात निवडणुकीपूर्वी तुफान हाणामारी; दोन गट कॅम्पसमध्येच एकमेकांना थेट भिडले

नॉर्थ कॅम्पसमध्ये विद्यार्थी गटांमध्ये झालेल्या संघर्षानंतर DUSU निवडणूक २०२६ बाबत तणाव वाढला आहे. १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या मतदानापूर्वी पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली.

विद्यापीठात निवडणुकीपूर्वी तुफान हाणामारी; दोन गट कॅम्पसमध्येच एकमेकांना थेट भिडले

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

दिल्ली विद्यापीठ छात्रसंघ निवडणूक २०२६ च्या मतदानापूर्वी नॉर्थ कॅम्पसमधील आर्ट्स फॅकल्टीच्या गेटजवळ प्रचारादरम्यान दोन विद्यार्थी गट समोरासमोर आले. वाद वाढल्यानंतर दोन्ही बाजूंनी लाथाबुक्क्या आणि काठ्यांचा वापर करून एकमेकांवर हल्ला केला. या रक्तरंजित संघर्षात एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने हिंदू राव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी झालेल्या या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली. उत्तर जिल्ह्याच्या डीसीपी निहारिका भट मोठ्या पोलीस फौजेसह घटनास्थळी पोहोचल्या आणि परिस्थितीचा आढावा घेतला. नॉर्थ कॅम्पसला आता छावणीचे स्वरूप आले असून कॉलेजच्या बाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. योगेश सिंह यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांसोबत बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्था बळकट करण्याचे निर्देश दिले होते, तरीही मतदानाच्या २४ तास आधी हाणामारी झाल्याने प्रशासनाच्या तयारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने पत्रक प्रसिद्ध करून एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले आहेत. हरी मंदिर परिसरातील अभाविप सदस्यांच्या निवासस्थानी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी घुसून हल्ला केल्याचा दावा अभाविपने केला. त्यावेळी तेथे महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या आणि बैठक सुरू होती. या घटनेनंतर एका संशयिताला पकडून पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. अभाविपने निष्पक्ष चौकशी व दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

दुसरीकडे एनएसयूआयने अभाविपचे सर्व आरोप फेटाळून लावले. एनएसयूआयच्या उमेदवार विजय शंकर मीना आणि गोपाळ चौधरी यांच्या घरांना अभाविपच्या कार्यकर्त्यांनी लक्ष्य केल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणुकीच्या तोंडावर भीती व दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगत एनएसयूआयने उमेदवार आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी दिल्ली पोलिसांकडे मागणी केली आहे.