अभ्यासिका व क्लालेस यांचे परिक्षण करून दोषींवर कारवाई करा; युवासेनेची आयुक्तांकडे मागणी 

शहरातील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका, नीट/जेईई कोचिंग क्लासेस यांची परिक्षणे करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र युवासेना सह सचिव कल्पेश यादव यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. 

अभ्यासिका व क्लालेस यांचे परिक्षण करून दोषींवर कारवाई करा; युवासेनेची आयुक्तांकडे मागणी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पुण्यातील गांजवे चौक परिसरातील अभ्यासिकेला शॉर्टसर्किटमुळे आग (Fire due to short circuit in the study) लागल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेत अभ्यासिकेतील लॅपटॉप, पुस्तके, नोट्स, खुर्चा आदी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणानंतर शहरातील स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका, नीट/जेईई कोचिंग क्लासेस (Competitive Exam Study Guide, NEET/JEE Coaching Classes) यांची परिक्षणे करून दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीचे पत्र युवासेना सह सचिव कल्पेश यादव (Kalpesh Yadav) यांनी पालिका आयुक्तांना दिले आहे. 

राज्यातील विविध ठिकाणाहून तसेच परराज्यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी तरुण-तरुणी पुण्यात येतात. त्यांना सुरक्षित वातावरणात अभ्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. मात्र, याच्या अत्यंत विपरीत पुणे शहरात घडत आहे. मध्यवर्ती पुण्यात अनेक अभ्यासिका इमारतीमध्ये दाटीवाटीच्या ठिकाणी असून, त्यावर कोणत्याही यंत्रणेचे नियंत्रण नाही. आग रोखण्यासाठी फायर इस्टिंग्वीशर किंवा पाण्याचे स्प्रिंकलर नाही.आग लावल्यावर त्या इमारतीतून बाहेर पडण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग देखील उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार सुरू आहे, असे कल्पेश यादव यांनी पालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना लिहिलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे. 

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोचिंग क्लासेस उभारण्यापुर्वी कोणतीही तपासणी किंवा परीक्षण न करता परवानगी दिल्याचे यामुळे स्पष्ट होत आहे. ही परवानगी मिळण्यासाठी अभ्यासिका किंवा कोचिंग क्लासेसच्या मालकांकडून बांधकाम विभाग, अग्निशमन विभागातील अधिकाऱ्यांसोबत काही आर्थिक व्यवहार करण्यात येतो का? अशी शंका उपस्थित झाली आहे. अभ्यासिका, कोंचिग क्लासेसच्या स्थापनेसाठी कोणतीही नियमावली नाही. मालकांना जागा सापडली की दुकानदारी सुरू, अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे उद्या पुणे शहरातील अभ्यासिका किंवा कोचिंग क्लासेसमध्ये मोठी दुर्घटना घडल्यास अनर्थ होऊ शकतो. याची संपूर्ण जबाबदारी आपली असेल. या पार्श्वभूमीवर विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टीने आमच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देऊन त्या पूर्ण कराव्यात. त्या पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांना सोबत घेऊन पालिकेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा कडक इशारा देखील कल्पेश यादव यांनी दिला आहे. 

प्रमुख मागण्या 

पुणे महापालिकेच्या हद्दीतील सर्व स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका, नीट / जेईई परीक्षेच्या कोचिंग क्लासेसच्या इमारतींची तपासणी करून त्यांचे फायर ऑडिट करण्यात यावे. परिक्षण म्हणजे केवळ कागदोपत्री कार्यवाही न करता बांधकाम विभाग, अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याची त्रिसदस्यीय समिती नेमून, त्याद्वारे सविस्तर परिक्षण करावे. अभ्यासिका किंवा कोचिंग क्लासेसने महापालिकेकडून कोणतीही परवानगी न घेतल्यास अशा अभ्यासिका व कोचिंग क्लासेसवर तातडीने सक्त कारवाई करीत त्यांना टाळे ठोकावे. पुणे शहरात स्थापन होणाऱ्या अभ्यासिका आणि कोचिंग क्लासेसच्या स्थापनेसाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी. तशी तरतूद नसल्यास ती रद्द करावी.