एमबीए सीईटीचा निकाल जाहीर; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळाले १०० पर्सेटाइल गुण

या परीक्षेत हर्षिता पांडे, प्रथम सिंह, प्रतीक म्हात्रे, मुजैद खान, आर्ची बिंदाल, लक्षिता चंडालिया आणि शाश्वी शाह या विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत.

एमबीए सीईटीचा निकाल जाहीर; ‘या’ विद्यार्थ्यांना मिळाले १०० पर्सेटाइल गुण

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (CET CELL) व्यवस्थापन पदवी अभ्यासक्रमाच्या (MBA) प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत सात विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल मिळवले आहेत. सहा सत्रात झालेल्या या परीक्षेत २८ प्रश्न चुकीचे आल्याने विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण असे २८ गुण देण्यात आले होते. आता लवकरच सीईटी कक्षाकडून प्रवेश प्रक्रिया (Admission Process) सुरू होण्याची शक्यता आहे.

या परीक्षेत हर्षिता पांडे, प्रथम सिंह, प्रतीक म्हात्रे, मुजैद खान, आर्ची बिंदाल, लक्षिता चंडालिया आणि शाश्वी शाह या विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल गुण मिळाले आहेत. सीईटी कक्षाने १ ते ३ एप्रिलदरम्यान सहा सत्रांमध्ये एमबीए अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा घेतली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून १ लाख ५७ हजार २८१ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यातील १ लाख २९ हजार १३१ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले होते. तर २८ हजार १५० विद्यार्थी गैरहजर होते.

दरम्यान, या परीक्षेनंतर सीईटी कक्षाने २८ ते ३० एप्रिलदरम्यान विद्यार्थ्यांना हरकती नोंदविण्यासाठी मुदत दिली होती. यावेळी राज्यभरातून २५३ हरकती नोंदविण्यात आल्या होत्या. त्यात सर्वाधिक १३४ तक्रारी लॉजिकल रिझनिंग, अबस्ट्रॅक्ट रिझनिंगच्या २१, क्वांटीटेटीव्ह अॅप्टिट्यूडच्या ३५ आणि व्हर्बल अॅबिलिटीच्या ३५ तक्रारी होत्या. या तक्रारीची शहानिशा केल्यावर सहा सत्रांमध्ये २८ प्रश्न चुकीचे असल्याचे सीईटी कक्षाच्या तज्ज्ञांच्या लक्षात आले. त्यानंतर सीईटी सेलने हे २८ गुण विद्यार्थ्यांना  देण्याचेही जाहीर करण्यात आले होते. निकालानंतर आता लवकरच एमबीए प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक सीईटी सेलकडून जाहीर करण्यात येईल.