अकरावी ऑनलाईन प्रवेश अर्जासाठी मुदतवाढ; आता या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
विद्यार्थ्यांना 3 जून पर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती.परंतु, आता सुधारित मुदतवाढीनुसार विद्यार्थी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
11th online admission : राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जात असलेल्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यभरातील दहा लाख 85 हजार 851 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली असून शिक्षण विभागातर्फे अकरावी प्रवेश अर्ज नोंदणीसाठी मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 3 जून पर्यंत नोंदणी करण्यास मुदत देण्यात आली होती.परंतु, आता सुधारित मुदतवाढीनुसार विद्यार्थी 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत.
राज्य शासनाच्या आदेशानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये इयत्ता अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. 26 मे पासून शिक्षण विभागाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळावर विद्यार्थी नोंदणी सुरू आहे. राज्य शासनाने नुकताच इन हाऊस कोटा आणि अल्पसंख्यांक कोटा यात बदल केला आहे. या बदलानुसार शैक्षणिक संस्था व विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास मुदत देणे गरजेचे आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी 5 जून पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
पुणे विभागात आत्तापर्यंत एक लाख 87 हजार 925 विद्यार्थ्यांनी, मुंबई विभागात 2 लाख 65 हजार 900 विद्यार्थ्यांनी, कोल्हापूर विभागात 1 लाख 7 हजार 12 विद्यार्थ्यांनी, छत्रपती संभाजीनगर विभागात 1 लाख विद्यार्थ्यांनी, नाशिक विभागात 1 लाख 12 हजार 1018 विद्यार्थ्यांनी, नागपूर विभागात 95 हजार 210 विद्यार्थ्यांनी, अमरावती विभागात 98 हजार 359 विद्यार्थ्यांनी तर लातूर विभागात 58 हजार 586 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्याचप्रमाणे इतर जिल्ह्यांमध्ये 61 हजार 712 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.