एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार, हेडफोन घेऊन उमेदवार परीक्षा केंद्रात

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या गट-क संयुक्त पूर्व परीक्षेतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय या परीक्षा उपकेंद्रावर गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. येथे परीक्षा चालू असताना एका विद्यार्थ्यांकडे हेडफोन आढळून आला आहे.

एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार, हेडफोन घेऊन उमेदवार परीक्षा केंद्रात

एज्युवार्त न्यूज नेटवर्क 

नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (Maharashtra Public Service Commission)  गट-क संयुक्त पूर्व परीक्षेतून (Group-C Combined Preliminary Examination) धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती येथील ब्रिजलाल बियाणी विज्ञान महाविद्यालय (Brijlal Biyani Science College) या परीक्षा उपकेंद्रावर गैरप्रकार (Malpractice in the exam) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. येथे परीक्षा चालू असताना एका विद्यार्थ्यांकडे हेडफोन आढळून आला आहे. त्यामुळे एमपीएससीच्या आयोजनावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. 

परीक्षा सुरु झाल्यानंतर १५ ते २० मिनिटांनी आपल्याकडे चुकून हेडफोन राहिल्याचे विद्यार्थ्यानेच पर्यवेक्षकांना सांगत ते जमा केले. परंतु परीक्षा हॉलमध्ये कोणतेही इलेक्ट्रिक गॅजेट किंवा मोबाइल नेण्यास बंदी असतानाही विद्यार्थ्याने हेडफोन नेल्याचा ठपका ठेवत या विद्यार्थ्यांवर राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने 'गट क' संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन रविवार १ जून रोजी करण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी तब्बल १ हजार १५ अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. परंतु यानंतरही शहरातील ब्रिजलाल बियाणी महाविद्यालय येथील केंद्रावर एका विद्यार्थ्याकडे हेडफोन आढळल्याने त्यावर एमपीएससीच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.