एमपीएससीने अपात्र ठरवलेल्या 'त्या' उमेदवाराला मोठा दिलासा
नितीन यांचा मुख्य परीक्षेचा निकाल प्रलंबित मूळ अर्जाच्या निकालाच्या अधीन राहील, असेही न्यायाधीकरणाने स्पष्ट करत पुढील सुनावणी १३ जून २०२५ रोजी असल्याचे सांगितले आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (Maharashtra Public Service Commission) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा-२०२४ (Maharashtra Group-B (Non-Gazetted) Services Combined Preliminary Examination-2024) घेण्यात आली होती. या परीक्षेत खेळाडू या खुल्या प्रवर्गातून अपात्र ठरविण्यात आलेले अर्जदार नितीन ढाकणे (Nitin Dhakane, the applicant who was disqualified from the open category of athletes) यांचा मुख्य परीक्षेसाठी अर्ज स्वीकारण्याचे व त्यांना मुख्य परीक्षेत बसू देण्याचे अंतरिम निर्देश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Maharashtra Administrative Tribunal) दिले आहेत.
याबरोबरच नितीन यांचा मुख्य परीक्षेचा निकाल प्रलंबित मूळ अर्जाच्या निकालाच्या अधीन राहील, असेही न्यायाधीकरणाने स्पष्ट करत पुढील सुनावणी १३ जून २०२५ रोजी असल्याचे सांगितले आहे.
जाहिरातीच्या अटी, तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या १७ ऑगस्ट २०१९ च्या प्रसिद्धी पत्रकानुसार, खेळाडू प्रवर्गातून आवेदन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज सादर करण्याच्या दिनांकापूर्वी क्रीडा व युवक सेवा उपसंचालकांकडून क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल अथवा क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केला असल्याची पोचपावती आवेदन अर्जासोबत सादर करणे अनिवार्य होते.
याचिकाकर्त्यांनी खेळाडू प्रवर्गाच्या पृष्ट्यर्थ आवेदन अर्जासोबत क्रीडा प्रमाणपत्र दाखल केलेल्या अर्जाची पोचपावती अनवधानाने सादर केली नाही परंतु सदरील तपशील आवेदन अर्जामध्ये स्पष्टपणे नमूद होता. त्यामुळे अशा उमेदवाराला अपात्र ठरविले होते. म्हणून त्यांनी अॅड. अमोल चालक यांच्यामार्फत मॅटमध्ये धाव घेतली होती. दरम्यानच्या काळात याचिकाकर्त्याचे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल प्राप्त झाल्यामुळे मॅटचे न्यायिक सदस्य न्या. व्ही. के. जाधव यांनी वरीलप्रमाणे अंतरिम निर्देश दिले आहेत. त्यामुळे अर्जदार नितीन ढाकणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.