SPPU विद्यापीठातर्फे सेट परीक्षा सुरळीत; ९२ हजार ५२५ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित

जून २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० हजार ४६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ७ हजार ३५६ ने वाढ झाली.यंदा नोंदणी केलेल्या १ लाख १७ हजार ७६८ विद्यार्थ्यांपैकी ९२ हजार ५२५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर २५ हजार २४३ विद्यार्थी अनुपस्थित होते.

SPPU विद्यापीठातर्फे सेट परीक्षा सुरळीत; ९२ हजार ५२५ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) सुरळीत आणि शांततेत पार पडली. महाराष्ट्रातील १७ आणि गोव्यातील एका शहरात अशा एकूण १८ शहरांतील २९४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली. एकूण ३२ विषयांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेसाठी १ लाख १७ हजार ७६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९२ हजार ५२५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

यंदाच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या नोंदणीत मागील वर्षाच्या तुलनेत वाढ झाली. जून २०२५ मध्ये झालेल्या परीक्षेसाठी १ लाख १० हजार ४१२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० हजार ४६ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ७ हजार ३५६ ने वाढ झाली.यंदा नोंदणी केलेल्या १ लाख १७ हजार ७६८ विद्यार्थ्यांपैकी ९२ हजार ५२५ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर २५ हजार २४३ विद्यार्थी अनुपस्थित होते. त्यामुळे अनुपस्थितीचे प्रमाण २१.४४ टक्के, तर उपस्थितीचे प्रमाण ७८.५६ टक्के नोंदविण्यात आले. मागील वर्षी उपस्थितीचे प्रमाण ८१.९२ टक्के होते. त्या तुलनेत यंदा उपस्थितीच्या प्रमाणात सुमारे ३.३६ टक्के घट झाली आहे.

परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पडावी, यासाठी सेट मुख्यालयाकडून २९४ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेनुसार, २४ विद्यार्थ्यांच्या एका ब्लॉकसाठी पर्यवेक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. याशिवाय, यंदा पहिल्यांदाच ३७ शहर विशेष निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती.

या विशेष निरीक्षकांची प्रमुख जबाबदारी परीक्षा केंद्रांना आकस्मिक भेटी देणे, तेथील व्यवस्थेची पाहणी करणे आणि परीक्षेचे संचालन नियमानुसार सुरू आहे की नाही, याचा आढावा घेणे अशी होती. या व्यवस्थेमुळे परीक्षा प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यास आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यास मदत झाली.

महाराष्ट्र आणि गोवा या दोन्ही राज्यांतील परीक्षा केंद्रांवर परीक्षा शांततेत पार पडली. परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे परीक्षा विभागाने स्पष्ट केले. परीक्षा आयोजनासाठी विविध महाविद्यालये, विद्यापीठे आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम केले.