शाळेतच मिळणार आता AI चे धडे; केरळ राज्याचा पुढाकार

KITE ने 2 मे पासून  80 हजार माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण सुरू केले आणि आतापर्यंत 20 हजार 120 शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

शाळेतच मिळणार आता AI चे धडे; केरळ राज्याचा पुढाकार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

शिक्षणाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत केरळ राज्याने आपल्या शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence-AI) या विषयाचा समावेश करून एक उपक्रम सुरू केला आहे. राज्याने माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान (ICT) अभ्यासक्रमात AI शिकण्याचे मॉड्यूल इयत्ता 7 वी मधील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. या संदर्भातील योजनांचे अनावरण नुकतेच करण्यात आले. 

 केरळ इन्फ्रास्ट्रक्चर अँड टेक्नॉलॉजी फॉर एज्युकेशन (KITE) ने प्रसिध्द केलेल्या माहितीनुसार या निर्णयामुळे केरळमधील 4 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांवना फायदा होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक वर्षात AI च्या क्षेत्रात सखोल अभ्यास करण्याची संधी मिळेल.

KITE ने 2 मे पासून  80 हजार माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी AI प्रशिक्षण सुरू केले आणि आतापर्यंत 20 हजार 120 शिक्षकांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

KITE चे CEO अन्वर सदाथ म्हणाले , " इयत्ता 1 आणि 3 च्या नवीन ICT पाठ्यपुस्तकांमध्ये FOSS (फ्री आणि ओपन-सोर्स सॉफ्टवेअर) आधारित शैक्षणिक ऍप्लिकेशन्स जसे की GCompris, eduActiv8, OmniTux आणि TuxPaint यांचा समावेश आहे.ज्यामध्ये रेखाचित्र, वाचन, भाषा शिकणे, संख्या, ऑपरेशन्स आणि लय समाविष्ट आहेत."

या आधी केरळ सरकारने AI शिक्षक ही संकल्पना अमलात आणली होती. ज्याची देशभर चर्चा झाली होती. या शिवाय विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग, एआय, रोबोटिक्स इत्यादींचा सराव करता यावा यासाठी पाठ्यपुस्तकांमध्ये 'पिक्टोब्लॉक्स' पॅकेजसह 'स्क्रॅच' सॉफ्टवेअर आणण्यात आले होते.