एनडीएत नारीशक्ती! श्रीती दक्ष कला शाखेत अव्वल

सन 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीए परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर 2022 मध्ये पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्सची तुकडी एनडीएमध्ये सामील झाली.

एनडीएत नारीशक्ती! श्रीती दक्ष कला शाखेत अव्वल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

भारतीय सशस्त्र दलातील (Indian Armed Forces) महिलांसाठी एक ऐतिहासिक क्षण म्हणून, १७ महिला कॅडेट्सच्या (17 female cadets) पहिल्या तुकडीने राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मधून पदवी प्राप्त केली आहे. या महिला कॅडेट्ससह ३०० हून अधिक पुरुष कॅडेट्स एनडीएतून पदवीधर होत आहेत. या सर्व महिला भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलात (Indian Army, Navy and Air Force) सामील होतील. महिलांमध्ये श्रीती दक्ष कला शाखेत अव्वल स्थानी आहे. 

सन 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महिलांना एनडीए परीक्षा देण्याची परवानगी देण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर 2022 मध्ये पहिल्यांदाच 17 महिला कॅडेट्सची तुकडी एनडीएमध्ये सामील झाली. पुण्यातील खडकवासला येथील एनडीए कॅम्पसमध्ये पासिंग आउट परेड झाली. या परेडला कॅडेट्सचे पालक, वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि खास आमंत्रित पाहुणे उपस्थित होते. यामधील 17 मुलींपैकी आर्मीमध्ये 9, नेव्ही 3 आणि एअरफोर्समध्ये 5 जणींचा समावेश आहे.

दरम्यान, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी मार्च 2025 मध्ये संसदेत सांगितले होते की 2022 मध्ये महिला कॅडेट्सच्या पहिल्या तुकडीच्या प्रवेशानंतर आतापर्यंत 126 महिलांना एनडीएमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यापैकी 121 सध्या प्रशिक्षण घेत आहेत. पाच कॅडेट्सनी राजीनामा दिला होता. 121 महिला देशातील 17 राज्यांमधून आहेत. त्यापैकी एक कर्नाटकची आहे. हरियाणामध्ये सर्वाधिक 35 महिला कॅडेट्स आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशातून 28, राजस्थानातून 13 आणि महाराष्ट्रातून 11 महिला कॅडेट्स आहेत. दक्षिणेकडील राज्यांमध्ये, कर्नाटकातून एका कॅडेटशिवाय, केरळमधून चार कॅडेट्स देखील एनडीएमध्ये सामील झाल्या आहेत. अकादमी सोडलेल्या पाच कॅडेट्स हरियाणा, हिमाचल प्रदेश, केरळ, पंजाब आणि उत्तर प्रदेशमधील आहेत.