दिवाळीपूर्वीच वेतनाचा ‘प्रकाश’; CHB प्राध्यापकांचे वेतन झाले जमा
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने उच्च शिक्षण संचालनालयाने वेतन व मानधन वेळेत वितरित करण्यासाठी विशेष नियोजन केले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून संचालनालयातील अधिकारी आणि कर्मचारी यासाठी युद्धपातळीवर कार्यरत होते.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा, यासाठी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि तासिका तत्त्वावर (सीएचबी) कार्यरत प्राध्यापकांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच वेतन व मानधन जमा करण्यात आले आहे. उच्च शिक्षण संचालनालयाने यासाठी राबविलेली विशेष मोहीम यशस्वी झाली असून, राज्यातील सर्व दहा विभागांमध्ये वेतन आणि मानधन जमा झाल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी दिली.राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार शिक्षण विभागाने सर्वांना दिवाळीपूर्वी वेतन देण्याबाबत आवश्यक कार्यवाही पूर्ण केली.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, या उद्देशाने उच्च शिक्षण संचालनालयाने वेतन व मानधन वेळेत वितरित करण्यासाठी विशेष नियोजन केले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून संचालनालयातील अधिकारी आणि कर्मचारी यासाठी युद्धपातळीवर कार्यरत होते. विभागीय सहसंचालकांनी संबंधित कोषागार कार्यालयांशी सातत्याने समन्वय साधत वेतन प्रक्रियेतील तांत्रिक व प्रशासकीय त्रुटींची पूर्तता केली. तसेच नियमित आढावा बैठकांच्या माध्यमातून संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यात आले.
या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे राज्यातील सर्व दहा विभागांतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सीएचबी प्राध्यापकांच्या खात्यात वेतन व मानधन जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर संबंधित कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
याबाबत बोलताना उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले, “राज्यावर दुष्काळाचे सावट असताना कोणाच्याही अडचणीत भर पडू नये, हीच आमची भावना होती. दिवाळीपूर्वी सर्व संबंधितांच्या खात्यात वेतन व मानधन जमा करण्याचे उद्दिष्ट आम्ही यशस्वीपणे पूर्ण केले. ज्ञानाचा दीप उजळविणाऱ्या प्रत्येकाच्या घरात आनंदाचे दीप उजळोत, हीच सदिच्छा.”
उच्च शिक्षण संचालनालयाच्या या विशेष मोहिमेमुळे दिवाळीपूर्वी वेतन व मानधन मिळण्याची प्रतीक्षा संपली असून, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह सीएचबी प्राध्यापकांची दिवाळी अधिक आनंददायी होणार आहे.