TAIT 2025 : मुलाखतीसह शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी जाहीर; १०,३२८ पदांसाठी ११,४९३ उमेदवारांची शिफारस

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ अंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या मुलाखतीसह शिक्षक भरती प्रक्रियेतील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

TAIT 2025 : मुलाखतीसह शिक्षक भरतीची गुणवत्ता यादी जाहीर; १०,३२८ पदांसाठी ११,४९३ उमेदवारांची शिफारस

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) २०२५ अंतर्गत पवित्र पोर्टलद्वारे राबविण्यात येणाऱ्या मुलाखतीसह शिक्षक भरती प्रक्रियेतील नियमित फेरीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. राज्यातील खाजगी शैक्षणिक संस्थांच्या १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी ११ हजार ४९३ उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्य चाचणीसाठी शिफारस करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांना त्यांच्या निवडीची स्थिती पवित्र पोर्टलवरील लॉगिनमध्ये पाहता येणार आहे.

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी २०२५ ही ऑनलाइन परीक्षा २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यभरातून २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले, तर १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी स्व-प्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली. दरम्यान, १ मे ते २० जुलै २०२६ या कालावधीत पवित्र पोर्टलवर विविध व्यवस्थापनांच्या जाहिराती प्राप्त झाल्या. त्यानंतर ६ ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत उमेदवारांकडून प्राधान्यक्रम नोंदवून घेण्यात आले. मुलाखतीसह निवड प्रकारात एकूण १ लाख ३१ हजार ५०५ उमेदवारांनी प्राधान्यक्रम लॉक केले होते.

नवीन गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १ हजार ६०९ पदे असून, त्यासाठी ४ हजार ४७८ उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. इयत्ता सहावी ते आठवीच्या ४ हजार ५०५ पदांसाठी १० हजार ७९२ उमेदवारांची, तर इयत्ता नववी ते दहावीच्या ४,२१४ पदांसाठी ११ हजार ८८४ उमेदवारांची शिफारस झाली आहे. अशा प्रकारे एकूण १० हजार ३२८ रिक्त पदांसाठी २७ हजार १५४ प्राधान्यक्रमांवर शिफारसी करण्यात आल्या असून, या प्रक्रियेत ११ हजार ४९३ उमेदवारांचा समावेश आहे. राज्यातील २ हजार ४१६ खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जाहिरातींच्या आधारे ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

शिफारस झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती आणि अध्यापन कौशल्य चाचणीसाठी ३ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर २०२६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. शासन निर्णय दिनांक २ एप्रिल २०२६ मधील तरतुदींनुसार ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश नियुक्ती प्राधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. उमेदवार आणि संबंधित व्यवस्थापनांना निवडीबाबत एसएमएसद्वारेही माहिती दिली जात आहे. उमेदवारांनी अधिकृत पवित्र पोर्टल वर लॉगिन करून निवडीची सद्यस्थिती तपासावी. व्यवस्थापननिहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावरील ‘Download’ मेनूमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दरम्यान, शिफारस झालेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पवित्र पोर्टलवरील मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेतील निवडीबाबत तक्रारी किंवा दुरुस्तीसाठी राज्यस्तरीय ‘तक्रार निवारण व दुरुस्ती समिती’ स्थापन करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी विहित प्रपत्रात आपली तक्रार किंवा दुरुस्तीची मागणी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत edupavitra2025grcc@gmail.com या ईमेलवर पाठवावी. त्यामुळे उमेदवारांनी गुणवत्ता यादी, निवडीची स्थिती आणि पुढील प्रक्रियेच्या सूचनांची वेळेत पडताळणी करणे आवश्यक आहे.