SPPU: विद्यापीठ लोकशाही वाचवा आंदोलन; विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने केलेल्या ठरावानुसार विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात कोणत्या विषयावर आंदोलने, सभा, मोर्चे काढावेत याबाबतचे निर्देश देणारे परिपत्रक काढले आहे. मात्र विद्यार्थी संघटनांनी या पत्रकाचा विरोध केला असून विद्यापीठाने तात्काळ हे पत्रक मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जागा ही महामहीम राज्यपाल यांच्या नावावर असून विद्यापीठ या जागेत १ रूपया नाममात्र दराने भाडेतत्त्वावर आहे. मात्र, याच विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठ परिसरात येण्या जाण्यावर तसेच विद्यापीठ आवारात बसण्यावर निर्बंध लादले आहेत. विद्यार्थ्यांनी विशिष्ट विषयावरच आंदोलने करावीत, असे परिपत्रक विद्यापीठाने प्रसिद्ध केले आहे. या विरोधात विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या असून येत्या २ नोव्हेंबर रोजी जयकर ग्रंथालय ते मुख्य इमारत या दरम्यान 'विद्यापीठ लोकशाही वाचवा आंदोलन' केले जाणार आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने केलेल्या ठरावानुसार विद्यापीठ प्रशासनाने विद्यापीठात कोणत्या विषयावर आंदोलने, सभा, मोर्चे काढावेत याबाबतचे निर्देश देणारे परिपत्रक काढले आहे. मात्र विद्यार्थी संघटनांनी या पत्रकाचा विरोध केला असून विद्यापीठाने तात्काळ हे पत्रक मागे घ्यावे, अशी मागणी केली आहे. येत्या 2 नोव्हेंबर रोजी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, संमत विद्यार्थी आंदोलन, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, सत्यशोधक विद्यार्थी आघाडी आणि पीएचडी रिसर्च स्कॉलर असोसिएशन या संघटनांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
विद्यापीठाच्या आवारात प्रवेश करण्याबाबत विद्यापीठाने नामफलक लावून सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार आयुका प्रवेशद्वारातून प्रवेश करण्याची वेळ सकाळी 9:30 ते 11 व सायंकाळी 6 ते 7.30 आहे. आयुका प्रवेशद्वार हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सेवेत असणारे अधिकारी व अधिकार मंडळाचे सदस्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांच्या सोयीसाठी दिलेल्या वेळेत खुले ठेवण्यात येईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ओळखपत्र पाहूनच विद्यापीठात प्रवेश देण्यात येईल. विद्यापीठात विनापरवानगी प्रवेश केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नाम फलकावर नमूद करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या मुख्य इमारती जवळ फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुख्य इमारती जवळ बसण्यास विद्यापीठाने मज्जाव केला आहे. त्यामुळे विद्यापीठ ही शासकीय मालमत्ता आहे की खाजगी मालमत्ता आहे ?असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
--------------
“विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी परिपत्रके काढून आंदोलन व मोर्चांच्या संविधानिक अधिकारांवर निर्बंध लादले आहेत. अनावश्यक सुरक्षा व्यवस्था आणि बॅरिकेडिंगमुळे विद्यापीठाच्या लोकशाही वातावरणाला छावणीचे स्वरूप आले आहे. विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संरक्षणासाठी आम्ही संविधानिक व लोकशाही मार्गाने संघर्ष सुरूच ठेवणार आहोत.”
— अभिषेक शेलकर अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती SPPU युनिट
-----------------------------------------------------------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रशासनाकडून आंदोलनांवर निर्बंध लादणे, विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणे आणि विद्यापीठातील लोकशाही अवकाश संकुचित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत विविध पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी प्रशासनाच्या भूमिकेविरोधात एकत्रित लढा उभारण्याचा निर्धार व्यक्त केला. या संदर्भात 29 ऑक्टोबर 2026 रोजी विद्यापीठात आयोजित बैठकीत शिवराय - बिरसा - फुले - शाहू - आंबेडकरी व पुरोगामी विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
- पवन जाधव, SFI विद्यापीठ युनिट कोषाध्यक्ष
--------------------------------------------------------------------------
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मधील सर्व आंबेडकरी व पुरोगामी विद्यार्थी संघटनांच्या वतीने 2 नोव्हेंबर 2026 रोजी दुपारी ४ वाजता मुख्य इमरत परिसरात शांततेच्या व संविधानिक मार्गाने विद्यापीठाने पारित केलेल्या तुघलकी की परिपत्रकाच्या विरोधात. हे परिपत्रक विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती व संचार स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे. आम्ही या परिपत्रकाचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी एकत्रित जमत आहोत तरी आमची सर्व शिव फुले शाहू आंबेडकरी व पुरोगामी संघटनांना विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे.
- डॉ. राहुल ससाणे ( आंबेडकरी कार्यकर्ते )