... मग CHB प्राध्यापकांचे वेतन कोणी अडवले?
तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधनाची देयके अदा करण्यासंदर्भात सर्व सहसंचालक कार्यालयाकडून लेखी स्वरूपातील अहवाल मागविण्यात आला.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यातील विविध महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर (सीएचबी CHB) काम करणाऱ्या प्राध्यापकांना गेल्या काही महिन्यांपासून वेतन दिले जात नसल्याची ओरड केली जात आहे. परंतु, राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने घेतलेल्या आढाव्यामधून शिक्षण विभागातील सर्व विभागामधील सीएचबी धारक प्राध्यापकांचे (CHB professors) वेतन अदा करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाले आहे. त्यामुळे मग CHB धारक प्राध्यापकांचे वेतन कोणी अडवले ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधन रखडले असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध केले जात होते. त्यावर राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने मुंबई ,पनवेल, पुणे, कोल्हापूर, जळगाव, छत्रपती संभाजी नगर ,अमरावती ,नांदेड, नागपूर या या विभागामध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत असलेल्या प्राध्यापकांच्या मानधनाची देयके अदा करण्यासंदर्भात सर्व सहसंचालक कार्यालयाकडून लेखी स्वरूपातील अहवाल मागविण्यात आला. त्यात सर्व कार्यालयांनी महाविद्यालय व प्राचार्यांच्या खात्यात आवश्यक निधी जमा केला असल्याचे कळविले आहे,असे पत्रक राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी प्रसिध्द केले आहे.
सहसंचालक कार्यालयाने सर्व तासिका तत्वावरील प्राध्यापकांचे मानधन संबंधित महाविद्यालयाकडे जमा केले असेल तर मग या प्राध्यापकांना अद्याप मानधन का ? मिळाले नाही.हे मानधन नेमके कोणी अडवून ठेवले ? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यात काही प्राध्यापकांचे विद्यापीठाकडून ॲप्रुव्हल आलेले नाही तर काही महाविद्यालयांनी सहसंचालक कार्यालयाकडे मानधन मिळण्यासंदर्भातील आवश्यक कार्यवाही केली नाही, असे बोलले जात आहे.
--------
उच्च शिक्षण विभागाकडे दाखल केलेले मानधानांचे सर्व प्रसव निकाली काढण्यात आले आहेत. मात्र,अनेक विद्यापीठांनी प्राध्यापकांच्या अप्रुव्हलची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.परिणामी अनेक प्राध्यापकांना वेळेत मानधन मिळाले नाही. त्यामुळे वेळेत ॲप्रुव्हल घेण्याबाबत दिरंगाई करणाऱ्या संबंधित महाविद्यालयांवर शासनाने कारवाई करावी.
- संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना,