एकाच वेळी अनेक परीक्षा, कोणती परीक्षा द्यावी विद्यार्थी संभ्रमात..
एमपीएससी गट-क, सेट, कृषी विद्यापीठ परीक्षा, मुक्त विद्यापीठ विज्ञान शाखेच्या परीक्षा याच दरम्यान होणार आहेत. त्यामुळे एकाच उमेदवाराला अनेक परीक्षांना सामोरे जाणे कठीण होणार आहे. जर कोणतीही परीक्षा एकाच दिवशी असेल, तर त्या परीक्षांचे प्रवेशपत्र आयबीपीएस संस्थेला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते; परंतु माहिती पाठवूनही एकाच दिवशी परीक्षा आल्या आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
या आठवड्यात एकाच वेळी अनेक परीक्षा आल्याने राज्यातील हजारो विद्यार्थी मोठ्या मानसिक संकटात (Student in mental distress) सापडले आहेत. या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC Exam) व केंद्रीय लोकसेवा आयोग यूपीएससी (UPSC Exam) आणि राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा नियोजित असतानाच शिक्षक भरतीसाठीची 'शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT Exam 2025) २०२५' ही परीक्षा २७ मे ते ५ जून या कालावधीत घेण्यात येत आहे. या सर्व परीक्षा एकाच कालावधीत आल्यामुळे अनेक उमेदवारांपुढे 'एकाच वेळी तीन परीक्षा, कोणती द्यावी?', असा गोंधळ निर्माण झाला आहे.
दरम्यान यामुळे हजारो विद्यार्थी उमेदवारांवर मानसिक व आर्थिक ताण येत असून, एक परीक्षेला मुकण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य सेवा मुख्य परीक्षा २७ ते २९ मे या कालावधीत घेतली जाणार आहे. तर एमपीएससी गट-क अराजपत्रित परीक्षा १ जून रोजी आहे. युपीएससीची नागरी सेवा पूर्व परीक्षा सुद्धा या कालावधीतच घेण्यात येणार आहे. तसेच राज्यातील काही विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा देखील याच कालावधीत घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थी मोठ्या मानसिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहेत.
एमपीएससी गट-क, सेट, कृषी विद्यापीठ परीक्षा, मुक्त विद्यापीठ विज्ञान शाखेच्या परीक्षा याच दरम्यान होणार आहेत. त्यामुळे एकाच उमेदवाराला अनेक परीक्षांना सामोरे जाणे कठीण होणार आहे. जर कोणतीही परीक्षा एकाच दिवशी असेल, तर त्या परीक्षांचे प्रवेशपत्र आयबीपीएस संस्थेला पाठविण्याचे आवाहन करण्यात आले होते; परंतु माहिती पाठवूनही एकाच दिवशी परीक्षा आल्या आहेत. त्यात दुरूस्ती करावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. यापूर्वी देखील परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केल्यावर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक बदलले होते. आता पुन्हा एकदा या वेळापत्रकात बदल करून परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.