Neet PG Exam 2025 : 15 जून रोजी होणारी परीक्षा स्थगित; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नीटच्या परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी ती दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी आधी नियोजित केंद्रांपेक्षा अधिक केंद्रांची आणि इतर मूलभूत गोष्टींची गरज पडणार आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. या संबंधित पुढची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल असंही नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने स्पष्ट केलं आहे.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नीट परीक्षेबाबत मोठी बातमी आहे. (NEET PG Exam 2025) सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निर्देशानंतर नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने (NBEMS) नीट परीक्षा पुढे घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही परीक्षा येत्या 15 जून रोजी दोन शिफ्टमध्ये घेण्यात येणार होती. मात्र, काही दिवसांपूर्वीच नीटची परीक्षा ही दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर आता दुसरा निर्णय घेत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायन्सने नीट परीक्षा आता एकाच शिफ्टमध्ये होणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. त्यामुळेच 15 जून रोजी घेण्यात येणारी परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
परीक्षेत अधिक पारदर्शकता येणार
नीटच्या परीक्षेमध्ये अधिक पारदर्शकता येण्यासाठी ती दोन शिफ्टमध्ये न घेता एकाच शिफ्टमध्ये घेण्यात येणार आहे. त्यासाठी आधी नियोजित केंद्रांपेक्षा अधिक केंद्रांची आणि इतर मूलभूत गोष्टींची गरज पडणार आहे. त्यामुळेच ही परीक्षा पुढे ढकलण्यात येणार आहे. या संबंधित पुढची तारीख ही लवकरच जाहीर करण्यात येईल असंही नॅशनल बोर्ड ऑफ एज्युकेशनने स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, या परीक्षेची नवीन तारीख जाहीर झाल्यानंतर परीक्षेच्या चार दिवस आधी परीक्षेचे हॉलतिकीट उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. उमेदवारांना https://natboard.edu.in/ या अधिकृत वेबसाइटवर हे हॉलतिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे. अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून उमेदवारांना ते डाऊनलोड करता येईल. याशिवाय हॉलतिकीट शिवाय कोणत्याही उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही असेही सांगण्यात आले आहे.