सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात

पुढील काही दिवसात पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जातील.परंतु गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी असणार आहेत.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी.प्रवेश पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

Ph.D.Admission: पीएच.डी.अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रतीक्षा पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)येत्या एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पीएच.डी. अभ्यासक्रमाची प्रवेश पूर्व परीक्षा (Ph.D.Admission CET) घेतली जाणार आहे. येत्या मंगळवारी पीएच.डी. प्रवेशाबाबत होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीत प्रवेश पूर्व परीक्षेच्या विविध विषयांवर शिक्कामोर्तब केले जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. 

विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नवीन नियमावली तयार केली आहे. परंतु, या नियमावलीला विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांकडून विरोध होत आहे. पीएच.डी. रिसर्च सेंटर असणाऱ्या आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शिकवल्या जाणाऱ्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनाच यापुढील काळात विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन करता येणार आहे. परिणामी पीएच.डी.  गाईडची संख्या कमी होणार आहे. पीएच.डी. गाईडकडे उपलब्ध असलेल्या जागा विचारात घेऊनच विद्यापीठाकडून पीएचडी प्रवेशासाठी प्रवेश पूर्व परीक्षा घेतली जाते. त्यामुळे पुढील काही दिवसात पीएच.डी. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपलब्ध असलेल्या जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवले जातील.परंतु,गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी असणार आहेत.

हेही वाचा : तलाठी भरती प्रक्रिया अडचणीत ? न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस

विद्यापीठातर्फे पीएच.डी.  प्रवेशाबाबत विविध बैठका घेतल्या जात आहेत. त्यातील एका बैठकीत एप्रिल महिन्यात परीक्षा घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात 7 एप्रिल रोजी विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पात्रतेसाठी घेतली जाणारी सेट परीक्षा होणार आहे. त्यामुळे पीएच.डी प्रवेश पूर्व परीक्षा ही दुसऱ्या आठवड्यात घेतली जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठातर्फे लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा केली जाईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.