RTE NEWS: आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियम
आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियमावली तयार करण्याच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीसमोर पालकांचे अभिप्राय सादर केले जाणार आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE ACT) 25 टक्के आरक्षण जागांसाठी राबविल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियम (Revised Rules)तयार करण्याच्या अनुषंगाने समिती स्थापन करण्यात आली असून या समितीसमोर पालकांचे अभिप्राय सादर केले जाणार आहेत. आरटीई प्रवेश प्रक्रियेत (RTE Admission Process)अधिक सुलभता यावी; या उद्देशाने पालकांकडून अभिप्राय स्वीकारले जात आहेत. शिक्षण विभागाकडून येत्या 25 एप्रिलपर्यंत हे अभिप्राय स्वीकारले जाणार असून अधिकाधिक पालकांनी अभिप्राय द्यावेत,असे आवाहन शिक्षण विभागाकडून (Department of Education)करण्यात आले आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सामाजिक व आर्थिक मागास संवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. मात्र, प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमावलीत काही बदल करावेत, अशी मागणी विविध पालक संघटनांकडून केली जात आहे.आरटीईच्या नियमावलीत बदल करण्याची आवश्यकता असल्याचे संस्थांचालकांकडूनही सांगितले जात आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी सुधारित नियमावली तयार करण्याच्या अनुषंगाने शासनास शिफारस करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीसमोर पालकांचे अभिप्राय सादर केले जाणार आहेत.त्यासाठी शिक्षण विभागाने 11 ते 25 एप्रिल या कालावधीत अभिप्राय मागवले आहेत.
अभिप्राय हे 100 शब्द मर्यादेत द्यावेत, अभिप्राय हे मोघम असू नयेत, अभिप्रायमध्ये कोणत्या संस्था, व्यक्ती, शाळेवर टीका टिप्पणी असू नये, विषयाशी संबंधीत अभिप्राय असावेत, आरटीई पोर्टलावर 'पालकांचे अभिप्राय' या खाली अभिप्राय देण्यात यावेत, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.