पाचवी व आठवीचे संकलित मुल्यमापन -२ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 

नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे.

पाचवी व आठवीचे संकलित मुल्यमापन -२ परीक्षेचे सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) - (संकलित मूल्यमापन - २) व इयत्ता पाचवी व आठवी वार्षिक परीक्षेचे (Fifth and Eighth Annual Examination) सुधारित वेळापत्रक (Revised schedule) शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. नियतकालिक मूल्यांकन अंतर्गत संकलित मूल्यमापन २ (Summative Assessment 2) द्वारे शासकीय व स्थानिक स्वराज संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित शाळेतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांची प्रथम भाषा, गणित व इंग्रजी या विषयांची दहा माध्यमात चाचणी घेण्यात येणार आहे. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका, उत्तर पत्रिका व उत्तर सूची पुरविण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

दिनांक २ एप्रिल ते ४ एप्रिल दरम्यान संकलित मूल्यमापन - २ घेण्याचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, काही  तांत्रिक कारणास्तव सदर संकलित मूल्यमापन - २  ही पुढे ढकलण्यात आली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार ते आता ४ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. 

सुधारित वेळापत्रक खालील प्रमाणे 

४ एप्रिल  प्रथम भाषा (सर्व माध्यम) तिसरी / चौथी - वेळ सकाळी ८.०० ते ९.३०

५ एप्रिल  गणित (सर्व माध्यम) पाचवी / सहावी वेळ सकाळी ८.०० ते ९.४५

 ६ एप्रिल इंग्रजी सातवी / आठवी वेळ सकाळी ८.०० ते १०.००

इयता ३ री, ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तांना प्रथम भाषा, गणित व इंग्रजी हे विषय सोडून इतर विषयांच्या संकलित मूल्यमापन -२ च्या प्रश्नपत्रिका वर्ग/विषय शिक्षकांनी स्वतः तयार करून नियमानुसार आपल्या शाळेपुरते परीक्षा घेण्याचे नियोजन करावे. वेळापत्रकात दिलेल्या वेळेत शाळेच्या स्थानिक गरजेनुसार बदल करता येतील परंतु, दिनांक, विषय व इतर बाबतीत बदल करण्यात येऊ नयेत. संकलित मूल्यमापन २ अंमलबजावणी संदर्भात संदर्भ क्र. २ नुसार सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. 

परीक्षेसाठी सुधारित सुचना खालीलप्रमाणे  

इयता पाचवी व आठवी करिता शिक्षकांनी स्वतः शालेय स्तरावर प्रश्नपत्रिकांची निर्मिती करून सर्व विषयांची वार्षिक परीक्षा एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात घेण्याचे नियोजन करावे. तसेच पुनर्परीक्षा व निकालासंदर्भात कार्यवाही करावी. याकरिता राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे च्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या नमुन्याप्रमाणे प्रश्नपत्रिका तयार कराव्यात व वार्षिक परीक्षा घेणेत यावी. यासाठी राज्यस्तरावरून प्रश्नपत्रिका पुरविण्यात येणार नाहीत याची नोंद घ्यावी. इयत्ता पाचवी व आठवी या वर्गाना PAT अंतर्गत उपरोल्लेखित तक्त्याप्रमाणे तीन विषयांची संकलित मूल्यमापन - २ व शासन निर्णयानुसार या तीन विषयांसह सर्व विषयांची वार्षिक परीक्षा या दोन्ही परीक्षा स्वतंत्रपणे घेणे बंधनकारक आहे. ज्या शाळांना शासनामार्फत घेण्यात येणारी PAT३ लागू नाही त्यांनी फक्त सर्व विषयांच्या वार्षिक परीक्षेचे नियोजन विहित प्रक्रियेने करावयाचे आहे.