हृदयद्रावक! तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू; शिक्षणासोबत कबड्डीत कबड्डीत होती नावलौकिकाता
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील झिल्पा गावात गौरी विसर्जनादरम्यान १३ वयोगटातील दोन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेचा सविस्तर तपशील आणि सुरक्षिततेबाबतचे धडे वाचा.
एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
नागपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या कुटुंबातील महिलांसोबत गौराई विसर्जनासाठी तलावावर गेलेल्या दोन विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काटोल तालुक्यातील झिल्पा गावात घडली. आयुष हरीष कुमरे आणि दर्शन धनराज लाड (दोघेही १३ वर्षे) अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. तलावावर गौरी विसर्जनाची प्रक्रिया सुरू असताना दोन्ही मुले पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या काकांनी पाण्यात उतरून दोघांनाही बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, आयुष आणि दर्शन दोघे आपापल्या कुटुंबातील महिलांसोबत गौरी विसर्जन करण्यासाठी तलावावर गेले होते. एका बाजूला गौरी विसर्जनाची प्रक्रिया सुरू होती, तर दुसऱ्या बाजूला हे दोघे पाण्याचा आनंद घेत होते. माञ पोहताना दोघेही पुढे गेले आणि पुण्याचा अंदाज न आल्याचे ही मोठी घटना घडली.

आयुष हा आठवीच्या वर्गात शिकत होता, तर दर्शन हा सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. दोन्ही विद्यार्थी अभ्यासात हुशार असून जय भवानी क्रीडा मंडळाशी कबड्डी खेळात ते सक्रिय सहभागी होते. शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची त्यांची स्वप्ने असतानाच काळाने त्यांच्यावर घाला घातला. त्यांच्या या अकाली निधनाची बातमी समजताच शाळेतील शिक्षक, सहकारी विद्यार्थी, क्रीडा मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. दोन हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, या घटनेची काटोल पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सण-उत्सवांच्या काळात नदी, तलाव किंवा इतर जलस्रोतांच्या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. अशा वेळी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे पालकांनी आणि कुटुंबीयांनी अधिक काळजीपूर्वक लक्ष देण्याची गरज या घटनेतून अधोरेखित झाली आहे. पाण्याची खोली, प्रवाह आणि परिसराची सुरक्षितता याबाबत पुरेशी माहिती नसताना मुलांनी पाण्यात जाणे टाळणे आवश्यक आहे. विसर्जनाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची उपस्थितीही महत्त्वाची ठरते.
झिल्पा गावातील या घटनेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. शाळांमध्ये विद्यार्थ्यांना जलसुरक्षेबाबत नियमित मार्गदर्शन देण्याबरोबरच पालकांनीही सण-समारंभाच्या वेळी मुलांवर सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत कशी करावी, पाण्याच्या ठिकाणी कोणती खबरदारी घ्यावी आणि धोकादायक ठिकाणी जाणे कसे टाळावे, याबाबत जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. आयुष आणि दर्शन यांच्या निधनाने कुटुंबीयांसह शाळा आणि क्रीडा क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या स्मृतींना आदरांजली वाहताना भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज व्यक्त होत आहे.