विद्यापीठाची पीएच.डी.पेट परीक्षा 10 जूननंतर; अखेर विद्यापीठ परीक्षा घेणार

उशीरा का होईना विद्यापीठाने पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तसेच संलग्न संशोधन केंद्रांकडून रिक्त जागांची माहिती मागवली आहे.

विद्यापीठाची पीएच.डी.पेट परीक्षा 10 जूननंतर; अखेर विद्यापीठ परीक्षा घेणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

युजीसी- नेट (UGC-NET)परीक्षेच्या गुणांच्या आधारे पीएच.डी.साठी प्रवेश (Admission for Ph.D.)देण्याचे युजीसीतर्फे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (Savitribai Phule Pune University)पीएच.डी.प्रवेशासाठी पेट परीक्षा (PET exam for PhD admission)घेतली जाणार की नाही याबाबत अनेक दिवसांपासून संभ्रम होता. मात्र,विद्यापीठ प्रशासनाकडून येत्या 10 जूनपर्यंत संलग्न संशोधन केंद्रातील रिक्त जागांची माहिती जमा केली जाणार आहे. त्यानंतरपेट परीक्षा घेतली जाणार आहे,असे परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आले आहे.

विद्यापीठ प्रशासनाने युजीसीकडे पेट परीक्षा घ्यावी किंवा घेऊ नये, याबाबत पत्रव्यहार केला होता.मात्र, विद्यापीठाला युजीसीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.त्यातच युजीसीकडून काही विषयांची नेट परीक्षा घेतली जात नाही. परिणामी या विषयांसाठी पेट परीक्षा घेणे आवश्यक होते.त्यामुळे उशीरा का होईना विद्यापीठाने पेट परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. तसेच संलग्न संशोधन केंद्रांकडून रिक्त जागांची माहिती मागवली आहे.त्यानुसार विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागवून पीएच.डी.पेट परीक्षा घेतली जाणार आहे. प्रत्यक्षात परीक्षा घेण्यास ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे.

विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार, विद्यापीठातील विभागप्रमुख, व सर्व संशोधन केंद्रांचे प्राचार्य/संचालक यांनी  आगामी पीएच्.डी. प्रवेश परीक्षा (पेट) आयोजित करण्याच्या अनुषंगाने पीएच्.डी. मान्यताप्राप्त संशोधन मार्गदर्शकांकडे रिक्त असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करणे आवश्यक आहे. जागा अद्ययावत करताना संशोधन केंद्र व संशोधन मार्गदर्शकांनी मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही करावी. ज्या संशोधन मार्गदर्शकांनी यापूर्वी त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत केल्या आहेत किंवा ज्या संशोधन मार्गदर्शकांकडे सद्यस्थितीत जागा रिक्त झाल्या आहेत किंवा ज्या संशोधन मार्गदर्शकांना नव्याने संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळाली आहे. अशा मार्गदर्शकांना पुनःश्च किंवा नव्याने जागा अद्ययावत करावयाच्या आहेत, त्या संशोधन मार्गदर्शकांनी त्यांच्या लॉगीनमधून त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत कराव्यात. त्यानंतर संबंधित संशोधन केंद्रांनी त्यांच्या मार्गदर्शकांकडील पुनःश्च किंवा नव्याने अद्ययावत केलेल्या रिक्त जागांना प्रवर्गनिहाय ऑनलाईन पध्दतीने मान्यता द्यावी. ही सर्व प्रक्रिया येत्या 10 जून, 2024 पर्यंत पूर्ण करावी.

ज्या संशोधन मार्गदर्शकांनी यापूर्वी त्यांच्याकडील रिक्त जागा अद्ययावत केल्या आहेत.परंतु त्यांना जागा अद्ययावत करण्याची आवश्यकता वाटत नाही, अशा संशोधन मार्गदर्शकांनी रिक्त जागा अद्ययावत करण्याची आवश्यकता नाही.