आता NET स्कोअरच्या आधारे Phd ला मिळणार प्रवेश; UGC चा मोठा निर्णय 

आता Phd अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उमेदवारांना विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेला बसावे लागणार नाही.

आता NET स्कोअरच्या आधारे Phd ला मिळणार प्रवेश; UGC चा मोठा निर्णय 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

आता Phd अभ्यासक्रमाच्या (Phd courses) प्रवेशासाठी उमेदवारांना विविध विद्यापीठांच्या प्रवेश परीक्षेला (University entrance exam) बसावे लागणार नाही. शैक्षणिक सत्र 2024-25 (Academic Session 2024-25) पासून नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (NET) स्कोअरच्या आधारे Phd  ला देखील प्रवेश मिळणार आहे,विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे याबाबत घोषणा करण्यात आली आहे.  

UGC कौन्सिलच्या बैठकीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP)-2020 अंतर्गत पीएचडी प्रवेशासाठी नवीन नियमांना मंजुरी देण्यात आली आहे. या नियमांनुसार आता NET पात्रताधारक  तीन श्रेणींसाठी पात्र असतील. NET मध्ये सर्वाधिक गुण असलेले विद्यार्थी श्रेणी-1 मध्ये असतील. ते पीएचडी प्रवेश आणि फेलोशिपसह जेआरएफ, असिस्टंट प्रोफेसरशिपसाठी देखील पात्र असतील. त्यांना पीएचडी प्रवेशासाठी मुलाखत द्यावी लागेल, जी यूजीसी नियमन-2022 वर आधारित असेल.

त्यानंतर अधिक टक्के असलेले विद्यार्थी दुसऱ्या श्रेणित येतील. हे विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक आणि Phd प्रवेशासाठी पात्र मानले जातील. परीक्षेत उत्तीर्ण पण कमी टक्केवारी असलेले विद्यार्थी श्रेणी-3 मध्ये असतील. ते फक्त पीएचडी प्रवेशासाठी पात्र असतील. निकालाच्या प्रमाणपत्रात उमेदवाराची श्रेणी दिली जाईल.

पीएचडी प्रवेशासाठी, श्रेणी-2 आणि श्रेणी-3 मधील उमेदवारांची निव्वळ टक्केवारी 70 टक्के वेटेजमध्ये ग्राह्य धरली जाईल आणि  मुलाखतीला 30 टक्के वेटेज असेल. या दोन्ही श्रेणींमध्ये NET स्कोअर फक्त एक वर्षासाठी वैध असेल. जर ते या कालावधीत पीएचडी प्रोग्राममध्ये नावनोंदणी करू शकले नाही तर त्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. उमेदवाराला पुन्हा NET उत्तीर्ण व्हावे लागेल.