विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक ; श्रेयांकासाठी इंटर्नशिप सेलची कार्यपध्दती प्रसिध्द 

इंटर्नशिप कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तज्ञांची व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढवणे शब्दसंग्रह सुधारणे,  व्यक्तिगत माहिती व  प्रपत्राची तयारी आणि ईमेल लेखनासाठी मदत करावी.

विद्यार्थ्यांना इंटर्नशिप बंधनकारक ; श्रेयांकासाठी इंटर्नशिप सेलची कार्यपध्दती प्रसिध्द 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या (National Education Policy)अंमलबजावणी करता पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी निश्चित केलेल्या श्रेयांक आराखड्यानुसार विद्यापीठ व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांसाठी इंटर्नशिप बंधनकारक (Internship Compulsory) असून त्याबाबतची कार्यपध्दती उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे (Department of Higher and Technical Education)प्रसिध्द करण्यात आली आहे.तसेच नोकरीसाठी विद्यार्थी पूर्णपणे तयार होईल, या दृष्टीने त्याचा व्यक्तिमत्व विकास करावा, अशा सूचना विद्यापीठ व महाविद्यालयांना (Universities and Colleges)अध्यादेशाद्वारे देण्यात आल्या आहेत. परिणामी पुढील काळात शैक्षणिक संस्थांना विद्यार्थ्यावर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे.

एनईपी अंमलबजावणीच्या दृष्टीने अभ्यासक्रम आराखडा व श्रेयांक आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने विद्यापीठ व महाविद्यालयाने त्यांच्या परिसरातील औद्योगिक कंपन्या, लघुउद्योग, व्यावसायिक संस्था, बँका व वित्तीय संस्था , शासकीय संस्था आदींबरोबर समन्वय साधण्याची आवश्यकता आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यापीठ व महाविद्यालयांनी इंटर्नशिप सेलची स्थापना करावी. या सेलचे प्रमुख म्हणून एका व्यक्तीची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करावी. तसेच इतर तज्ज्ञ व विद्यार्थी सदस्य म्हणून नियुक्त करावेत.

हेही वाचा : विद्यापीठ नाटक वादावर प्रशांत दामलेंनी करावा हस्तक्षेप: सचिन गोस्वामी

इंटर्नशिप कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तज्ञांची व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य वाढवणे शब्दसंग्रह सुधारणे,  व्यक्तिगत माहिती व  प्रपत्राची तयारी आणि ईमेल लेखनासाठी मदत करावी. त्याचप्रमाणे गट चर्चा मुलाखत कौशल्य , अभियोग्यता प्रशिक्षण आणि सराव चाचण्या तांत्रिक अहवाल लेखन,  सादरीकरण कौशल्य, परदेशी भाषा निपुणता इत्यादी बाबत काम करावे,असे स्पष्ट करण्यात आले आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांचा टाईपमपास बंद होणार  आहे 

इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप कालावधीत शिकलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकणारा एक सर्वसमावेशक अहवाल तयार करायचा आहे. या अहवालावर इंटर्नशिप पर्यवेक्षक, नोडेल ऑफिसर आणि मार्गदर्शक शिक्षक स्वाक्षरी करतील. विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर त्याच्या मूल्यमापनाकरिता संबंधित विभागाने स्थापन केलेल्या विद्यार्थ्यांना तज्ज्ञ समिती समोर अनुभवाचा परिसंवाद देणे बंधनकारक राहील, असे राज्य शासनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.