विद्यापीठ नाटक वादावर प्रशांत दामलेंनी करावा हस्तक्षेप: सचिन गोस्वामी

दोन्ही गटातील गैरसमज कमी करुन एकोपा निर्माण करणे आणि कलावंतांना निर्भयी वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे.. तरच अखिल भारतीय नाट्य परिषदेला मातृ संस्था म्हणता येईल; सचिन गोस्वामी

विद्यापीठ नाटक वादावर प्रशांत दामलेंनी करावा हस्तक्षेप: सचिन गोस्वामी

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (Savitribai Phule Pune University) राडा प्रकरणातील वाद काही केल्या थांबायचे नाव घेताना दिसत नाही. या प्रकरणावर अनेक कलावंतांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत. त्यातच आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtra Chi Hasya Jatra) या कार्यक्रमाचे लेखक  व दिग्दर्शक सचिन गोस्वामी (Sachin Goswami) यांनी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्याकडे ललित कला केंद्रात (Lalit Kala Kendra) जाऊन दोन्ही गटाशी बोलून या वादावर सामोपचाराने तोडगा काढण्याची अपेक्षा फेसबुक पोस्टद्वारे केली आहे . 

जेष्ठ कलावंत व कलेची माहिती असल्याने यामधून मार्ग निघण्याची शक्यता आहे. तिथे जावून तथ्य जाणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना लोककला या प्रकरणाची माहिती देऊन. त्यांचा गैरसमज कमी करुन एकोपा निर्माण करणे आणि कलावंतांना निर्भयी वातावरण निर्माण करणे अपेक्षित आहे.. तरच अखिल भारतीय नाट्य परिषदेला मातृ संस्था म्हणता येईल. दामले यांनी यातून मार्ग काढावा ही विनंती आणि अपेक्षा व्यक्त केली आहे. 

पुणे विद्यापीठातील  ललित कला केंद्राकडून (Lalit Kala Kendra) काही दिवसांपूर्वी 'जब वी मेट' हे नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) आक्षेप घेत बंद असलेल्या ललित कला केंद्राची तोडफोड करत कलाकारांना मारहाण केली. या घटनेचे पडसाद उमटत असून कलाकारांनी या तोडफोडीचा आणि मारहाणीचा निषेध केला आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या (Maharashtra Chi Hasya Jatra) कार्यक्रमाचे लेखक सचिन  गोस्वामी (Sachin Goswami) यांनी आता अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांच्याकडे मागणी केली आहे. प्रशांत दामले यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना लोककला या प्रकाराची माहिती द्यावी, अशी मागणी गोस्वामी यांनी केली आहे. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्यावतीने 'जब वी मेट'हे नाटक सादर करण्यात आले. या नाटकात प्रभू श्रीराम आणि सीता यांचा कथित अपमान केला असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नाटकात गोंधळ घातला. कलाकारांना मारहाण करत ललित कला केंद्राची तोडफोड केली. पोलिसांनी ललित कला केंद्राचे प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह 6 जणांना अटक केली. या घटनेचे राज्यातील कलाविश्वात तीव्र पडसाद उमटले. अनेक कलाकारांसह आणि ललित कला केंद्राचे माजी विद्यार्थी असलेल्या कलाकारांनी या मारहाणीचा विरोध केला. 


प्रियदर्शनी इंदलकरनेही केला निषेध 
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर (Priyadarshini Indalkar) हीने देखील झालेल्या तोडफोडीचा निषेध केला. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून या प्रकारावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून तिने अभाविपच्या कृत्याचा निषेध केलाय. "ललित कला केंद्र, पुणे येथील विद्यार्थी कलावंतांवर हल्ला करुन नाटक बंद पाडणाऱ्या कृत्याचा तीव्र निषेध.."अशी प्रतिक्रिया प्रियदर्शनी इंदलकर हिने व्यक्त केली