PRN BLOCK : सत्र पूर्तता संपलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी 

नेमक्या कोणत्या वर्षापासूनच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध असेल याबाबत स्पष्टता आली नव्हती. मात्र, आता विद्यापीठाने अंतिम पूर्व व अंतिम वर्षाचे सर्व विषय सुटू शकतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

PRN BLOCK : सत्र पूर्तता संपलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी 

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील सत्र पूर्तता संपलेल्या अंतिम पूर्व व अंतिम विषयात अनुत्तीर्ण असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दोन संधी  विद्यापीठाने उपलब्ध करून दिल्या आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे या संदर्भातील स्पष्ट परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल 88 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : प्राध्यापक भरतीसाठी केवळ ऑफलाईन अर्ज ; उमेदवारांची पिळवणूक , ऑनलाईन अर्जाची मागणी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सत्र पूर्तता संपलेल्या विद्यार्थ्यांचे पीआरएन नंबर ब्लॉक करण्यात आले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थी पदवीपासून वंचित राहणार असल्याची बाब निदर्शनास आली होती. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनातर्फे याबाबत विद्यार्थ्यांच्या हिताच्यादृष्टीने विचार करण्यात आला.युजीसीकडे पाठपुरावा करण्यात आला.त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र नेमक्या कोणत्या वर्षापासूनच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्याची संधी उपलब्ध असेल याबाबत स्पष्टता आली नव्हती. मात्र, आता विद्यापीठाने अंतिम पूर्व व अंतिम वर्षाचे सर्व विषय सुटू शकतील, अशा सर्व विद्यार्थ्यांना परीक्षा देण्याच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार अंतिम वर्ष अनुत्तीर्ण असलेले परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक नियमांनुसार पात्र असलेले विद्यार्थी या दोन परीक्षा देऊ शकतात. तसेच अंतिम पूर्व वर्षातील अनुत्तीर्ण असलेले परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक नियमानुसार पात्र असलेले विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात बॅकलॉग आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचा अंतिम पूर्व वर्षातील बॅकलॉग सुटू शकतो,असे सर्व विद्यार्थी विद्यापीठाकडून दिल्या जाणाऱ्या परीक्षेच्या दोन संधींना पात्र आहेत. 

मौखिक, प्रात्यक्षिक, प्रोजेक्ट, डेजरटेशन या व इतर अनुषंगिक परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण असणारे विद्यार्थी परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक नियमानुसार पात्र असलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. तसेच अंतिम व अंतिम पूर्व वर्षाच्या परीक्षेमध्ये न येणा-या विद्यार्थ्यांना सुद्धा विशेष बाब म्हणून परीक्षेची संधी मिळू शकते. त्यासाठी संबंधित विद्यार्थ्याने महाविद्यालयाकडे अर्ज करणे अपेक्षित आहे. एक वर्ष संधीसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्राचार्यांनी प्रचलित आदेशानुसार विविध केंद्रीय व राज्यस्तरीय प्राधिकरणाचे निकष, परीक्षा विषयक व अभ्यासक्रम विषयक मार्गदर्शक तत्वे व अटी या सर्वांची खातरजमा करून पात्र विद्यार्थ्यांच्या विनंती बाबत स्पष्ट अभिप्राय व विद्यार्थ्यांचे अर्ज परीक्षा विभागाकडे सादर करावेत.

 विशेष सवलत दिलेल्या विद्यार्थ्यांना नियमित परीक्षांमध्ये सामावून घेणे शक्य असल्यास ते समक्ष विषयानुसार परीक्षा देतील अन्यथा अशा विद्यार्थ्यांची परीक्षा स्वतंत्रपणे आयोजित करण्यात येईल. पात्र विद्यार्थ्यांना दोन परीक्षांची विशेष संधी मिळाल्यानंतर च्या काळात यापैकी कोणत्याही विद्यार्थ्यास व अशा इतर विद्यार्थ्यांना भविष्यकाळात संधी दिली जाणार नाही, असे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. महेश काकडे यांनी स्पष्ट केले आहे.