एमईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये क्रीडेला असलेले महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडेलाही योग्य वेळ देऊन शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात समतोल साधावा, असे आवाहन त्यांनी केले.

एमईएस इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

एमईएस इंग्लिश मीडियम स्कूल, शिरवळ येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात सहभागी होण्यासाठी समान संधी मिळावी आणि त्यांच्या क्रीडा कौशल्याला वाव मिळावा, या उद्देशाने वजनाच्या गटानुसार ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना क्रीडेमधील महत्त्व, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, सांघिक भावना आणि खिलाडूवृत्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थिनी त्रिशा पवार, राजलक्ष्मी शेठे आणि अनुष्का शुक्ला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. क्रीडा शिक्षक विशाल कोर्डे यांनी विद्यार्थ्यांना नियमितपणे विविध क्रीडा प्रकारांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. तसेच, अपयशाची भीती न बाळगता सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश त्यांनी दिला.

विद्यालयाच्या प्राचार्या स्वाती जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये क्रीडेला असलेले महत्त्व अधोरेखित केले. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच क्रीडेलाही योग्य वेळ देऊन शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात समतोल साधावा, असे आवाहन त्यांनी केले. पर्यवेक्षिका सुजाता टेकाडे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

इयत्ता नववीतील सुकन्या मोरे आणि अनिरुद्ध गाढवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आत्मविश्वासाने केले.

५० मीटर धावण्याच्या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. ऊर्जा, शिस्त आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवत विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा आनंद घेतला. प्रत्येक विद्यार्थ्याला सहभागी होण्याची, स्पर्धा करण्याची आणि स्वतःमधील क्षमता ओळखण्याची संधी मिळावी, हा उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.