राज्यात प्री स्कूलच्या 9 हजारांहून अधिक शाळांची नोंदणी; पुण्यात १ हजार ५९५ शाळा
पूर्व प्राथमिकच्या शाळांचे प्रकार अनेक आहेत ज्याला डे केअर सेंटर, मॉन्टेसरी शाळा, बालवाडी, खेळण्याची शाळा, नर्सरी स्कूल, शिशू विहार अशी अनेक नावे देखील देण्यात आली आहेत.

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क
राज्यात पूर्व प्राथमिकच्या (Junior KG) अनेक खाजगी शाळा आपल्याला दिसून येतात. मात्र,त्या शाळांमध्ये मुलांना योग्य त्या सोयी-सुविधा आहेत का ? पाल्यांसाठी तिथले वातावरण कसे आहे, याची माहिती मिळावी म्हणून शिक्षण विभागाने (department of education) १५ दिवसांपूर्वी अशा शाळांची नोंदणी प्रक्रिया (Registration Process) सुरु केली आहे. त्यामध्ये राज्यात आतापर्यंत ९ हजार ४०२ पूर्व प्राथमिक शाळांनी नोंदणी केल्याचे शिक्षण विभागाच्या ताज्या अहवालात म्हटले आहे.
शाळांमध्ये पाल्याचा प्रवेश घेताना अनेक पालक ती शाळा अधिकृत आहे का नाही याची चौकशी करत नाही. त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. म्हणूनच पालकांनी देखील त्या शाळेविषयी संपूर्ण माहिती घेऊन आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करणे गरजेचे आहे. याबरोबरच शाळेचा परिसर स्वच्छ असावा, पाल्यांना आरामदायक खुर्चा, टेबल असावेत, शैक्षणिक खेळणी असावीत. त्याचबरोबर शाळेची इमारत हवेशीर असावी, पुरेसा सूर्यप्रकाश असणे गरजेचे आहे. शाळेतील शिक्षकांचे शिक्षण किती झाले आहे, फी किती घेतली जाते, शाळा नोंदणीकृत आहे का, हे पालकांच्या पर्यायाने बालकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यामुळे शासनाने या खासगी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करण्याचे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, अशी माहिती शिक्षण विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.
पूर्व प्राथमिकच्या शाळांचे प्रकार अनेक आहेत ज्याला डे केअर सेंटर, मॉन्टेसरी शाळा, बालवाडी, खेळण्याची शाळा, नर्सरी स्कूल, शिशू विहार अशी अनेक नावे देखील देण्यात आली आहेत.
केजी शाळांची जिल्हानिहाय संख्या
पुणे- १,५९५, ठाणे-९५१, अहिल्यानगर-५७६, नागपूर ५२५, मुंबई महापालिका अंतर्गत- ३०९, मुंबई शिक्षण उपसंचालक अंतर्गत-२२, नाशिक- ३७१, नांदेड- २११, कोल्हापूर- ३५८ उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २०० पेक्षा कमी संख्येने शाळांची नोंदणी झाली आहे.