MPSC कडून PSI परीक्षेचा निकाल जाहीर, अतिश मोरे राज्यात अव्वल

आयोगाने PSI संवर्गातील ३७४ पदांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या दीड वर्षापासून उमेदवारांना या निकालाची प्रतीक्षा होती. उशीरा का होईना आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

MPSC कडून PSI परीक्षेचा निकाल जाहीर, अतिश मोरे राज्यात अव्वल

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट -ब सेवा मुख्य परीक्षेतील (Group - B Services Main Examination) पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची तात्पुरती निवड यादी (Provisional selection list released) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. यामध्ये आतिश मोरे या उमेदवाराने सर्वाधिक गुणांसह राज्यात प्रथम अव्वल क्रमांक पटकावला आहे. 

आयोगाने PSI संवर्गातील ३७४ पदांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेण्यात आली होती. गेल्या दीड वर्षापासून उमेदवारांना या निकालाची प्रतीक्षा होती. उशीरा का होईना आयोगाने सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. जाहीर करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी उमेदवारांनी अर्जामध्ये केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. यामध्ये काही दावे खोटे निघाल्यास उमेदवाराची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाऊ शकते, असे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 

तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केल्यानंतर अपात्र उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय सादर करण्यासाठी सात दिवसाचा कालावधी देण्यात येतो. त्याप्रमाणे महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ – पोलीस उपनिरीक्षक तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता ६ ते १२ मे २०२५ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.