CBSE Result : आता दहावी, बारावीचा निकाल डिजिलॉकर अ‍ॅप आणि वेबसाईटवर दिसणार

सीबीएसई बोर्डाचा दहावी, बारावीचा निकाल यंदा प्रथमच डिजिलॉकर अ‍ॅप आणि वेबसाइट digilocker.gov.in वर देखील पाहायला मिळणार आहे.

CBSE Result : आता दहावी, बारावीचा निकाल डिजिलॉकर अ‍ॅप आणि वेबसाईटवर दिसणार

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE Board Exam) दहावी, बारावीच्या परीक्षा संपून जवळपास दोन महिने उलटले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना निकालाचे वेध लागले आहे. निकाल कधी लागणार या प्रतिक्षेत असताना निकालासंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) महत्वाची माहिती देण्यात आली आहे. निकाल हा बोर्डाची अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जाहीर करण्यात येणार आहे. परंतु,  प्रथमच डिजिलॉकर अ‍ॅप आणि वेबसाइट digilocker.gov.in वर देखील पाहायला मिळणार आहे. त्यासाठी डिजिलॉकरवर खाते असणे गरजेचे आहे.

CBSE  कडून  निकालाची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. परंतु 20 मे नंतर निकाल जाहीर करण्यात येणार आहे.  मागील वर्षी सीबीएसई बोर्ड 10वी, 12वीचा निकाल मे महिन्यातच जाहीर केला होता. यंदा निकालात सीबीएसई बोर्डाने एक महत्वाचा बदल केला आहे. 

असे बनवा डिजिलॉकरवर खाते

प्रथम DigiLocker च्या अधिकृत वेबसाइट digilocker.gov.in वर जा. त्यानंतर “Get Started with Account Confirmation” वर जावे. तुमचा वर्ग (10वी किंवा 12वी) निवडा आणि त्यानंतर शाळेचा कोड, रोल नंबर आणि 6 अंकी प्रवेश कोड टाका. आता मोबाईल नंबर, जन्मतारीख आणि OTP इत्यादी तपशील भरा. निकाल जाहीर झाल्यानंतर, तुम्हाला तुमचा निकाल थेट या खात्यावर मिळेल. तुमचे डिजिलॉकरवर खाते असेल तर तशी सूचना तुम्हाला खाते तयार करताना देईल. त्यामुळे पुन्हा खाते तयार करण्याची गरज नाही. वेबसाईटप्रमाणे डिजिलॉकर अ‍ॅपवर या पद्धतीने खाते उघडता येईल. त्यासाठी गूगल प्ले स्टोर अ‍ॅप डाऊनलोड करुन घ्यावा.

सीबीएसई बोर्डाच्या 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये यंदा सुमारे 39 लाख विद्यार्थी बसले होते. यापैकी 21 लाख 86 हजार 940 विद्यार्थ्यांनी हायस्कूल बोर्डाच्या (दहावी) परीक्षेसाठी तर 16 लाख 96 हजार 770 विद्यार्थ्यांनी इंटरमिजिएट बोर्डाच्या (बारावी) परीक्षेसाठी नोंदणी केली होती. हे सर्व विद्यार्थी आता निकाल लागण्याची वाट पाहत आहेत.