बुद्ध मूर्ती वाद: विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी आंदोलनानंतर सकारात्मक

प्रशासकीय मान्यता न घेतल्यामुळे ही मूर्ती ठेवता येणार नसल्याचे विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर विभागातून बुद्ध मूर्ती हटविण्यात आली.मात्र, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धाची मूर्ती हटवण्यात आल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या.

बुद्ध मूर्ती वाद:  विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी आंदोलनानंतर सकारात्मक

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील (Department of Education, Savitribai Phule Pune University) तथागत गौतम बुद्ध यांची मूर्ती (Statue of Gautama Buddha)हटवण्यात आल्यामुळे विद्यार्थी संघटनांनी आक्रमक होत गुरूवारी रात्री शांतता रॅली काढत आंदोलन केले.त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत मूर्तीबाबत विद्यापीठाचे कुलगुरू (Vice-Chancellor of the University) व शिक्षणशास्त्र विभाग प्रमुख निर्णय घेतील,असे पत्र काढले. परिणामी विद्यापीठातून हटवण्यात आलेली बुद्ध मूर्ती पुन्हा विभागात ठेवली जाईल,अशी शक्यता निर्माण झाली आहे.

विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागातील काही संशोधक विद्यार्थ्यांनी विभागाला गौतम बुद्ध यांची मूर्ती भेट दिली होती.विभागात सन्मानपूर्वक ही मूर्ती ठेवण्यात आली होती.परंतु, प्रशासकीय मान्यता न घेतल्यामुळे ही मूर्ती ठेवता येणार नसल्याचे विभागाला कळविण्यात आले. त्यानंतर विभागातून बुद्ध मूर्ती हटविण्यात आली.मात्र, जगाला शांततेचा संदेश देणाऱ्या बुद्धाची मूर्ती हटवण्यात आल्यामुळे विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या. विविध विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी गुरूवारी विद्यापीठात रॅली काढून या घटनेचा निषेध व्यक्त केला.

पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांना गुरूवारी रात्री विद्यापीठाच्या मुख्य इमारतीपर्यंत रॅली काढण्यास परवानगी दिली.त्यानुसार विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीजवळ एकत्र येऊन घोषणा दिल्या.त्यावर विद्यापीठाच्या प्रभारी कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे यांनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला.तसेच विद्यापीठ प्रशासनाकडून वरिष्ठांना विद्यार्थ्यांच्या मागण्या सकारात्मकपणे सादर केल्या जातील,असे पत्र दिले.