विद्यापीठात 'महाराष्ट्राचा बौद्ध वारसा' या विषयावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

थायलंडच्या चुलालोंगकॉर्न विद्यापीठाचे प्रा. भद्रा रुजीरथत हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

विद्यापीठात 'महाराष्ट्राचा बौद्ध वारसा' या विषयावर  तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Savitribai Phule Pune University) 'महाराष्ट्राचा बौद्ध वारसा' (Buddhist heritage of Maharashtra) या विषयावर १८ ते २० जानेवारी या कालावधीत तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील बौद्ध वारसा आणि व्यापारी, कारागीर, सामान्य लोकांमध्ये बौद्ध विचारांच्या प्रसारामध्ये काय भूमिका आहे याचा शोध घेणे आहे.हे या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्दिष्ट आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातील बौद्ध आणि तिबेटी संस्थेचे संचालक डॉ. निरज कुमार यांच्या हस्ते होणार आहे.

आंतरराष्ट्रीय परिषदेस थायलंडच्या चुलालोंगकॉर्न विद्यापीठाचे प्रा. भद्रा रुजीरथत हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला प्र-कुलगुरू प्रा.डॉ पराग काळकर, प्रभारी कुलसचिव डॉ.  विजय खरे, पाली व बुद्धीष्ठ स्टडीजचे विभाग प्रमुख डॉ. महेश देवकर उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा : मुंबई विद्यापीठ 'आविष्कार'चा विजेता; SPPU ठरले उपविजेता

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभाग यांच्या संयुक्त विद्यामाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. भारताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ही परिषद घेण्यात येत आहे. या परिषदेत बौद्ध संस्कृतीसह बौद्ध वारसा संवर्धन, ऐतिहासिक नोंदी, मजकूर स्रोत, पुरातत्वीय अवशेष इत्यादींवर तीन दिवस चर्चा होणार आहे. तसेच या परिषदेत ६ आंतरराष्ट्रीय आणि १९ राष्ट्रीय संशोधक आपले शोधनिबंध सादर करणार आहेत.