शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी नियुक्तीसाठी आर्थिक मागणी; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू झाल्यानंतर अनेक प्रक्रिया सुलभ झाल्या असल्या तरी सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. नाशिक जिल्ह्यात असेच एक प्रकरण उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शिक्षकांना सोयीच्या ठिकाणी नियुक्तीसाठी आर्थिक मागणी; शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित

एज्युवार्ता न्यूज नेटवर्क 

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू झाल्यानंतर अनेक प्रक्रिया सुलभ झाल्या असल्या तरी सोयीच्या ठिकाणी नियुक्ती मिळवून देण्याच्या नावाखाली आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. नाशिक जिल्ह्यात असेच एक प्रकरण उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी नांदगाव तालुक्याचे शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात यांना निलंबित करून कठोर कारवाई केली आहे.

राज्याचे शिक्षण मंत्री असलेल्या नाशिक जिल्ह्यात शिक्षण विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे एकामागून एक समोर येत आहेत. यापूर्वी प्राथमिक शिक्षण अधिकारी यांना शिक्षकांच्या बदल्यांमध्ये पैसे घेतल्याच्या आरोपावरून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्या पाठोपाठ शालार्थ आयडी प्रकरणही सुरूच आहे. अशा पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशीच नांदगावचे शिक्षण विस्तार अधिकारी निलंबित झाल्याने विभागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेत पवित्र पोर्टलद्वारे सुमारे ५०० शिक्षकांची भरती करण्यात आली असून त्यांना विविध शाळांमध्ये नियुक्ती देण्यात आली आहे. बहुसंख्य शिक्षक आनंदित असताना काही जणांना मात्र मिळालेले ठिकाण गैरसोयीचे वाटत होते. त्यामुळे त्यांनी सोयीच्या ठिकाणी बदल मिळण्यासाठी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला. नांदगावचे शिक्षण विस्तार अधिकारी योगेश थोरात यांच्याशीही काही शिक्षकांनी संपर्क केला. त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे सांगत सोयीचे ठिकाण मिळवून देण्याचे आश्वासन दिले. मात्र यासाठी आर्थिक देवाणघेवाण करावी लागेल, असेही त्यांनी सुचवल्याचा आरोप आहे.

या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्याने केलेल्या आर्थिक मागणीचे ऑडिओ रेकॉर्डिंग मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यापर्यंत पोहोचले. त्यांनी तातडीने चौकशी सुरू केली. चौकशीत आरोपाला पुष्टि मिळाल्यानंतर थोरात यांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून असे प्रकार करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.